मुंबई - गेल्या ५ वर्षात सरकारने देशातील जनतेची घोर फसवणूक केली असून एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. आता त्याच भाजपने संकल्प पत्र आणले आहे. हे संकल्प पत्र धोका असून हा चुनावी जुमला आहे. त्यामुळे यांच्यावर देशातील जनता विश्वास ठेवणार नसल्याची टीका नवाब मलिक यांनी केली.
आज भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा हा संकल्प पत्र नावाने जाहीर केला. मात्र, त्यांच्या संकल्प पत्रातील दिलेल्या आश्वासनांची किती पुर्तता झाली? याची माहिती या संकल्प पत्रात दिली असती तर बरे झाले असते, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. २ कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. त्याची पुर्तता किती झाली? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? देशात १०० नवी शहरे उभी राहिली का? असे सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केले.
काश्मीरचा मुद्दा जनसंघ असल्यापासून यांच्या संकल्प पत्रात पुढे आला आहे. १९८९ पासून राममंदिराचा मुद्दा संकल्प पत्रात आहे. मात्र, कुठलीही पुर्तता होत नाही. ६० वर्षातील शेतकऱ्यांना पेन्शन, लहान व्यापाऱ्यांना पेन्शन देऊ सांगत आहेत. मात्र, निवडणूक संपल्यावर अमित शाह सांगतिल की 'ये चुनावी जुमला है', असा उपरोधिक टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
नावे बदलून देश चालत नाही. गेली ५ वर्षे नाव बदलण्याची नाटके या सरकारने केली होती आणि पुन्हा नाव बदलण्याची घोषणा सरकार करत आहे. देशात वॉटर रिसोर्स मिनिस्टरी आहे. त्याचे पाणी मंत्रालय करत आहेत. यापुर्वी योजना आयोगाचे नीती आयोग करण्यात आले. बर्याच योजनांची नावे बदलली. तसेच एका विभागाचे नाव बदलण्याचे काम आहे. हा कार्यक्रम म्हणजे जुमलाच आहे. ६ हजार देण्याची घोषणा बजेटमध्ये केलीच होती आणि आता पुन्हा करत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ती प्रथा अवैध आहे. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही लोकांना तुरुंगात टाकाल. ही प्रथा नष्ट करण्यासाठी समाजातील लोकांना सोबत घेऊन कार्यक्रम तयार केला पाहिजे. तीन तलाकचा मुद्दा पुढे करून इतर समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न आहे, आम्ही मुस्लीम लोकांना नीट करायला निघालो आहोत. असे म्हटल्याने काही निष्पन्न होणार नाही. समाजामध्ये प्रबोधन केले पाहिजे. प्रथा नष्ट केली पाहिजे. आमचा तर या प्रथेला विरोधच आहे. आमची सत्ता आल्यावर हा कायदा या देशात राहणार नाही, असे आश्वासनही मलिक यांनी दिले.
राम मंदिराची आश्वासने ऐकत ऐकत लोक आता कंटाळली आहेत. निवडणुका येतात त्यावेळी रामाची शपथ घेऊन राम मंदिर तिथेच बनवणार सांगतात आणि परत विसरूनही जातात. यांचा हा चुनावी जुमला आहे. यांच्यावर आता लोकांचा विश्वास राहिलेला नसल्याचे मलिक म्हणाले.