मुंबई - राज्यात विरोधी पक्ष राहणार नाही, अशा वल्गना करण्यात आल्या परंतु निकाल वेगळा लागला. त्यामुळे भाजपचा सत्तेचा माज जनतेने उतरवला आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आमदार नवाब मलिक यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.
गुरुवारी विधानसभेत निकाल आल्यावर महाराष्ट्रात महाआघाडीने ९८ जागेवर यश संपादन केले आहे. तर आमच्या १४ जागा कमी मतांनी पराभूत झाल्या आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले. निवडणूक सुरु होण्याअगोदर काही न्यूज चॅनेलने ओपिनियन पोल दाखवुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियाच्या लोकांनी सुडाचे राजकारण केले त्यामुळे अशांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. वृत्त माध्यमांनी दाखवलेल्या चुकीच्या ओपिनियन पोलमुळे भाजपची सत्ता जाताजाता वाचली आहे. मोदी ज्याठिकाणी गेले त्याठिकाणच्या जागा पडल्या आहेत. मोदींची जादू राहिलेली नाही हे सिद्ध झाले आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. आमचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे दाऊदशी संबंध आहे, असे काही न्यूज चॅनेलने दाखवुन पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
सरकारने जी आश्वासने दिली होती ती सरकारने पार पाडली नाहीत. राज्यात कर्जमाफी, पुरग्रस्त लोकांना मदत मिळाली नाही, तरुण वर्ग नाराज होता. १३ लाख लोकांचा रोजगार गेला होता. परंतु आम्ही काही करतो आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सरकारचा झाला. न केलेली कामे दाखवून जनतेची दिशाभूल केली गेली. भूमीपुजन करण्यात आली त्या कामांची उद्घाटन केली जात आहेत, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. राज्यात सरकार विरोधात वातावरण होते. महाआघाडीला ९८ जागा मिळाल्या. सत्ता आली असताना त्यांच्याकडे जल्लोष साजरा होताना दिसत नाही उलट आघाडीच्यावतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे. जनतेने आम्हाला विरोधी कौल दिला आहे. तरीसुद्धा आम्हाला उर्जा मिळाली आहे. जनतेने भाजप - सेनेला एकप्रकारे उत्तरच दिले आहे.
साताऱ्याचे उदयनराजे भोसले पक्ष सोडून गेले परंतु जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. असेच दुसरे जयदत्त क्षीरसागर मंत्री पदासाठी गेले. त्यांनाही जनतेने जागा दाखवली आहे.फोडाफोडीचे राजकारण चालत नाही हे दाखवून दिले आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
पवारसाहेबांनी ईडीला सणसणीत उत्तर दिले त्यामुळे राज्यात पक्षाला उर्जा मिळाली. पक्षाने चांगली उभारी घेतली आहे. मात्र, आम्हाला जनतेने विरोधी म्हणून बसवले आहे. त्यामुळे आमचे काम पार पडणार आहे. आम्ही राज्यात ११८ जागा लढवल्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५४ ठिकाणी निर्विवाद बहुमत मिळविले असून राज्यातील ४७ मतदारसंघात राष्ट्रवादी दुसर्या क्रमांकावर राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १६.७१ टक्के म्हणजे ९२ लाख १६ हजार ९११ एवढी मते मिळवली असल्याची माहिती मलिक यांनी दिली.
आम्ही सरकारमध्ये असताना मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं होता. त्यामध्ये चुनाभट्टी बीकेसी हा पुल दीड महिने बंद पडला आहे. मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. एमएमआरडीएने चुनाभट्टी बीकेसी या पुलाचे उद्घाटन करुनही सुरु करण्यात आलेला नाही. त्यापुलाचे तो रविवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन करणार आहोत. यासाठी हिम्मत असेल तर एमएमआरडीएने रोखून दाखावावे असे आव्हान मलिक यांनी दिले.