मुंबई - मालाडमध्ये एक चिमुकला उघड्या गटारीत पडल्याची घटना घडली आहे. अद्यापही त्या मुलाचा तपास लागलेला नाही. याप्रकरणी दोषींवर ३०४ अन्वये (सदोष मनुष्यवधाचा) गुन्हा दाखल करुन, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
ही दुर्दैवी घटना आहे. याअगोदर अनेक लोकांचे गटारात पडून मृत्यू झाले आहेत. या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांच्या मृत्यूची जबाबदारी अद्याप कुणावर ठेवण्यात आलेली नसल्याचे मलिक म्हणाले.
महापालिकेने गटारावरील प्लास्टिकची झाकणं खरेदी केली, पण ती पावसाच्या पाण्यात वाहून जात आहेत. या घटना पालिकेच्या हलगर्जीपणामुळे घडत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला. दरम्यान वारंवार घडणाऱ्या या घटनांची जबाबदारी सरकारने निश्चित करावी, असेही मलिक म्हणाले.