मुंबई - सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. मालदीवमध्ये वसुली झाल्यानंतरच रियाला अटक केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला. मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवरही त्यांनी गंभीर आरोप केले. तसेच वानखेडे कुटुंबियांनी या प्रकरणाचा खुलासा करावा, असेही ते म्हणाले. मुंबईत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
वानखेडेंचे मालदीव कनेक्शन
![नवाब मलिक यांनी सादर केलेले छायाचित्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ncb-wanlhede-7209781_21102021130502_2110f_1634801702_1041.jpg)
सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची केंद्र सरकारने एनसीबीमध्ये बदली केली. वानखेडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रिया चक्रवतीला अटक केली. 4-4 हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले. एकप्रकारे दहशत निर्माण करण्याचे काम या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झाले. कोरोना काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही त्यावेळी तिकडे उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का..? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही मलिक म्हणाले. दरम्यान, वानखेडे कुटुंबातील सदस्यांचे मालदीवमधील फोटो प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी प्रसिद्ध केले.
![नवाब मलिक यांनी सादर केलेले छायाचित्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ncb-wanlhede-7209781_21102021130502_2110f_1634801702_688.jpg)
आर्यन खान प्रकरण बनावट
कार्डिलीया क्रुझवर 2 ऑक्टोबरला एनसीबीने छापेमारी केली. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह सात जणांना ताब्यात घेतले. आर्यन खानचे प्रकरण आणि एनसीबीची कारवाई बनावट असल्याचा आरोप यापूर्वी मलिक यांनी केला आहे. तसे पुरावे प्रसार माध्यमांतून जाहीरही केले असून क्रूझवर कुठलेही ड्रग्ज सापडले नाहीत. दाखवण्यात आलेले पुरावे समीर वानखेडे यांच्या कार्यालयातील असल्याचा मलिक यांचा दावा आहे.
![नवाब मलिक यांनी सादर केलेले छायाचित्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ncb-wanlhede-7209781_21102021130502_2110f_1634801702_778.jpg)
हेही वाचा - एनसीबीची कारवाई सुरूच : 'मन्नत' पाठोपाठ अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी छापेमारी