मुंबई: रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाहेर आलेल्या नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पोपट असा उल्लेख करत त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले तसेच मुंबई महापालीकेतील भ्रष्टाचाराची लंका उध्वस्त करणार केल्या शिवाय शांत बसणार नाही त्यासाठी हनुमान भक्तांना सोबत घेउन प्रचार करेल असेही राणा यांनी स्पष्ट केले.
14 वर्ष तुरुंगात रहायला तयार: नवनीत राणा यांनी म्हणले आहे की, मी अशी काय चूक केली होती, हनुमान चालीसा वाचणे आणि श्रीरामाचे नाव घेणे यासाठी मला 14 दिवसासाठी जेलमध्ये ठेवले, हा जर गुन्हा असेल तर मी चौदा दिवस नाही 14 वर्ष तुरुंगात रहायला तयार आहे. एखाद्या महिलेला राज्यसरकार दाबू शकत नाही, ही लढाई मी पुढेही सुरुच ठेवेल, माझ्यावर क्रूर बुद्धीने कारवाई करण्यात आली. मला अजूनही त्रास होतोय मात्र डॉक्टरांना विनंती करून मी डिस्चार्ज घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी अधिकारांचा गैरवापर, करून आम्हाला तुरुंगात डांबले, खुद्द न्यायालयाने सांगितले आहे की राजद्रोहाचा गुन्हा आमच्यावर होऊ शकत नाही. मात्र राज्य सरकारने क्रूर बुद्धीने आमच्यावर कारवाई केली. या कारवाईनंतर ही आपण राज्य सरकारला घाबरणार नाही. आपले काम राज्य सरकारच्या विरोधात असेच सुरू ठेऊ असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे.
असली-नकली सांगण्याची वेळ आली, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोध्येत लावण्यात आलेल्या बॅनरवर देखील नवनीत राणा यांनी टीका केली, शिवसेनेला असली कोण? आणि नकली कोण? हे सांगण्यासाठी आता बॅनरबाजी करावी लागत आहे. मात्र बाळासाहेब हे एकटेच असली नेते होते. आता शिवसेनेत केवळ नकली लोक उरली आहेत असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
मुख्यमंत्र्यांना आव्हान देते त्यांनी महाराष्ट्रात निवडणुकीला कुठेही उभे रहावे मी त्यांच्या विरोधात उभी राहिल, तसेच मुख्यमंत्र्यांना महिलांची ताकद काय असते ? हे आपण दाखवून देऊ. आधी मुंबई महापालीकेतील भ्रष्टाचाराची लंका उध्वस्त करेल त्यासाठी शिवसेनेच्या विरोधात प्रचारामध्ये उतरेण , कारण मुंबई महापालिकेत शिवसेनेने मोठा भ्रष्टाचार केला आहे. मी मुंबईची मुलगी आहे त्यांना त्यांची जागा दाखवेन असेही राणा यांनी यावेळी स्पष्ट केले.
दिल्ली दरबारी तक्रार करणार, राज्यसरकारने सूड भावनेने कारवाई केली. याची तक्रार दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचे देखील त्यांनी सांगीतले. एक महिला म्हणून राज्यात कशा प्रकारची वागणूक देण्यात आली. पोलीस स्टेशन मध्ये कोणत्या सुविधा दिल्या गेल्या नाहीत. झोपण्यासाठी केवळ एक चटाई देण्यात आली. पहिल्या रात्री पूर्ण रात्रभर उभे रहावे लागले. या सर्व बाबींवर तक्रार करणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.
हेही वाचा : MP Raut on Ayodhya tour : आदित्य ठाकरें सोबत देशभरातील शिवसैनिक आयोध्या दौऱ्यावर जाणार - खा. राऊत