मुंबई - कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व पातळ्यांवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 'नेव्हल डॉकयार्ड'नेही आपल्या पातळीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यांनी स्वतःचे 'हॅन्ड हेल्ड आयआर टेम्परेचर सेन्सर' विकसित केले आहे.
दर दिवशी जवळपास 20 हजार कर्मचारी डॉकयार्डमध्ये प्रवेश करत असतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक कर्मचारी आणि मजुराच्या शरीराचे तापमान तपासणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे नेव्हल डॉकयार्डने स्वतःचे सेन्सर विकसित केले आहे.
हेही वाचा - युवा अभियंत्याची धडपड ! कोरोनाग्रस्तांसाठी बनवतोय स्वस्त किंमतीतील व्हेंटिलेटर
बाजारात सध्या इलेक्ट्रॉनिक थर्मल गन मशीन आणि थर्मामिटरचा तुटवडा असून, मागणी वाढली आहे. डॉकयार्डने तयार केलेले मशीन एक हजार रुपायांपेक्षाही कमी किंमतीत तयार होत आहे. या मशीनमधील सुटे भाग हे नेव्हल डॉकयार्डमध्ये वापरण्यात येणाऱ्या रोजच्या साहित्यामधील आहेत. नव्याने विकसित करण्यात आलेल्या या तापमापक यंत्राची अचूकता ही 0.02 डिग्री सेल्सियसपर्यंत आहे. यात एक इन्फ्रारेड सेन्सर आणि एक एलईडी डिस्प्ले आहे. नेव्हल डॉकयार्डच्या प्रवेशद्वारावर सध्या याचाच वापर करुन कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात आहे.