मुंबई - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात येत असलेले आरोप हे गंभीर आहेत, परंतु यासंदर्भात पोलीस चौकशीत जे काही स्पष्ट होईल, त्यानंतरच मुंडे यांच्यावरील कारवाईचा विषय समोर येईल. मात्र, केवळ आरोप केले म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंडे यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यास नकार दिला आहे. यामुळे तूर्तास मुंडे यांना अभय मिळणार असून पक्षाकडूनही पाठराखण केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील दोन दिवसांपासून लैंगिक अत्याचाराच्या विषयावर चर्चेत आलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना तूर्तास पक्षाकडून अभय देण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई पक्षाकडून केली जाणार नसल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
...म्हणून एखाद्यावर कारवाई करणे योग्य नाही
जयंत पाटील म्हणाले की, मुंडे यांच्यावर जे काही आरोप करण्यात येत आहेत, त्यासंदर्भात पोलिसांनी चौकशी करावी, आम्ही पोलिसांच्या चौकशीला सर्व प्रकारची मदत करू. मात्र, केवळ आरोप होत आहेत म्हणून एखाद्यावर कारवाई करणे योग्य नाही. दरम्यान, मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना आपली सर्व बाजू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून सर्व माहिती दिली असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपल्यावर पक्षश्रेष्ठी आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले.
मुंडेंवर पक्षाकडून कोणतीही कारवाई नाही
मुंडे यांचे प्रकरण समजून घेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मुंडे यांच्यासोबत जयंत पाटील यांनी एक बैठक घेऊन मुंडे यांची संपूर्ण बाजू ऐकून घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुंडेंवर पक्षाकडून कोणती कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. यामुळे मागील दोन दिवसांपासून मुंडेंवर केल्या जात असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या आरोपांसंदर्भात मुंडेची पक्षाकडून पाठराखण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.