मुंबई : केंद्र सरकारने बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या शैक्षणिक क्षमता अधिक बळकट होण्यासाठी निपुण भारत हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. या अभियानाची अंमलबजावणी राज्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदच्या वतीने करण्यात येत आहे. राज्यातील बालकांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांच्या पालकांना या प्रक्रियेत सामावून घेणे महत्त्वाचे होते. कोरोनामुळे अक्षर ओळख तुटलेल्या मुलांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी मुलांसोबतच त्यांच्या पालकांचीही मानसिकता, तयारी करणे गरजेचे होते असे कैलास पगारे यांनी सांगितले.
केंद्राच्या अभियानाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद : केंद्र सरकारने राबवलेल्या या अभियानाला अन्य राज्यांमध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी, महाराष्ट्रामध्ये मात्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शाळेत येणारे बालक हे सहा तास शाळेच्या वातावरणात असते. मात्र, उरलेला वेळ ते आपल्या आईवडिलांसोबतच असते विशेषतः आई सोबत अधिक असते. त्यामुळे बालकांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये त्याच्या आईचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणून आधी या महिलांना शिक्षित करण्यावर आपण भर दिल्याचे पगारे सांगतात. व्हाट्सअपच्या माध्यमातून या महिलांना शिक्षणाचे व्हिडिओ पाठवले जातात. या व्हिडिओच्या आधाराने बालकांना घरच्या घरी शिक्षण दिले जात आहे. पंधरा दिवसातून एकदा माता, या बालकांची उजळणी घेतली जाते. तसेच काही महिला या समूह चर्चेतूनही शिक्षण घेत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे तीस ते चाळीस टक्के मुलांची आकलन शक्ती वाढली असल्याचा दावा पगारे यांनी केला आहे.
राज्यातील बालकांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांच्या पालकांना या प्रक्रियेत सामावून घेणे महत्त्वाचे होते. कोरोनामुळे अक्षर ओळख तुटलेल्या मुलांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी मुलांसोबतच त्यांच्या पालकांचीही मानसिकता, तयारी करणे गरजेचे होते - प्रकल्प संचालक कैलास पगारे
परराज्यातून महाराष्ट्राचा कित्ता गिरवणार : राज्य सरकारच्या या प्रकल्पाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात दोन लाख साठ हजार महिलांचे व्हाट्सअप गट कार्यरत आहेत. प्रत्येक मुलाला लिहिता वाचता यावे, त्याची कौशल्य विकसित व्हावीत यासाठी मुलांना शाळा पूर्व तयारीचा भाग म्हणून मातांना सुशिक्षित करण्यावर भर दिला जातो आहे. केंद्र सरकारचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्यातील सुमारे अडीच लाख गटांच्या माध्यमातून पहिली ते तिसरी वर्गातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांवर काम केले जात आहे. महाराष्ट्राने हे उद्दिष्ट एक वर्ष आधीच पूर्ण करण्याचे ठरवले आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्राच्या या उपक्रमाची दखल हरियाणा मध्य प्रदेश, हिमाचल या राज्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता या राज्यांमधील अधिकारी महाराष्ट्रात लवकरच येणार आहेत. छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल, उत्तर प्रदेश या राज्यातील शिक्षणाधिकारी महाराष्ट्रात येऊन या अभिनव उपक्रमाचा अभ्यास करून आपल्या राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पगारे यांनी दिली.
पुण्यात होणार शिक्षण परिषद : एक ते 15 जून या कालावधीत पुणे येथे जी 20 राष्ट्रांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये विविध राष्ट्रातील शिक्षण मंत्री सहभागी होणार आहेत. पायाभूत शिक्षण, संख्या ज्ञानावर या परिषदेत विस्तृत चर्चा केली जाणार असून त्याची तयारीही प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती पगारे यांनी दिली.
हेही वाचा - Maharashtra Board SSC Result : प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; असा करा चेक