मुंबई: सोमवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसने ठराव केला की, ज्या व्यक्तींकडे एक किंवा त्यापेक्षा अधिक पदे असतील अशांना केवळ एकच पद आपल्याकडे ठेवता येईल. नसीम खान यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष अशी दोन पदे होती. प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेसच्या बैठकीत नसीम खान यांनी राजीनाम्याची घोषणा केली व काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्याकडे पत्राद्वारे प्रचार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला आहे.
'एक व्यक्ती एक पद' या निर्णयानंतर महाराष्ट्रातून राजीनामा देणारे नसीम खान हे पहिले पदाधिकारी ठरले आहेत. नसीम खान यांनी स्वत:हून त्यांच्याकडील दोन पैकी एका पदाचा राजीनामा दिला. याबद्दल महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांनी त्यांचे कौतुक केले आहे. मात्र अद्यापही काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडे एक किंवा त्यापेक्षा अधिक पद आहेत. एक आणि दोन जून या रोजी काँग्रेसने शिर्डीमध्ये चिंतन शिबीर ठेवले आहे. त्या शिबिरात देखील या उपक्रमाबाबत आढावा घेतला जाणार आहे.