मुंबई - सुशांतसिंह राजपूतची पूर्वीची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. त्या झालेल्या एका पार्टीला ठाकरे सरकारमधील एक युवा मंत्री देखील उपस्थित असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी म्हटले आहे. भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिशा सालियान हिला भगवती रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आले होते. पण, तिच्या पोस्टमार्टेम अहवालामध्ये तिच्या गुप्तांगावर जखमा आढळून आल्याचे नारायण राणे म्हणाले.
सुशांतच्या घराजवळ एक बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात? 13 तारखेला ते तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले. तिथे मंत्री गेले असतील तर कॅमेऱ्यात त्यांचा ताफा वगैरे ते येणार नाहीत. सगळ्यांना माहिती आहे कोण आहे ते, ज्याअर्थी जेवढा दबाव सरकार आणि पोलिसांवर येतोय, अधिकारी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यांना मी सांगू इच्छितो, हे होऊ शकणार नाही. विरोधी पक्ष सक्षम आहे. तो अशा गोष्टी होऊ देणार नाही, असेही नारायण राणे म्हणाले.
रिया चक्रवर्ती ही सुशांतची मैत्रिण, त्याच्यासोबत राहायची. ती 9 तारखेला त्याला सोडून गेली. या प्रकरणातील प्रमुख व्यक्ती तीन-चार दिवसांपासून गायब झाली आहे. पोलिसांना याबाबत माहिती नाही. मुंबई पोलिसांना याबाबत माहिती नसेल, असे मला वाटत नाही. मंत्री असो किंवा कुणीही असो, निरपराध मुलींवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्याचे या सरकारला लायसन्स दिलेले नाही. रिया चक्रवर्तीला शोधून तिच्याकडून अधिकची माहिती घेणे आवश्यक आहे. सुशांतच्या प्रकरणात जे लोक वाचवायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी गप्प बसावे, नाहीतर त्यांच्याही कुंडल्या बाहेर काढल्या जातील, असा इशाराही नारायण राणेंनी दिला.