मुंबई - राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नसून जनतेस व कोणत्याही महिला सुरक्षित नाहीत, अशी भयावह स्थिती आहे. राज्य हाताळण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी पडले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार केल्याचे राणे पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच सचिन वाझे प्रकरणावरून राणे यांनी सरकारला लक्ष करताना वाझे यांनी केलेल्या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
दिशा सालीयन, सुशांतसिंग प्रकरणाची चौकशी करावी -
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील आढळून आलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणावरून राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. सचिन वाझे यांनी हाताळलेल्या सर्व प्रकरणाची आणि दिशा सालीयन, सुशांत सिंग या आत्महत्या प्रकरणाची चौकशी, अशी मागणी राणे केली. तसेच सरकारविरोधातील आरोपी बद्दल त्यांच्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
..तर अनेक वझे तयार होतील -
राज्यात एका बाजूला भ्रष्टाचार सुरू आहे. तर दुसरीकडे कोणताही कायदा राहिलेला नाही. जनतेच्या प्रश्नासंदर्भात कोणतेही नियोजन राहिलेले नाही. राज्य सरकार केवळ वाझे यांच्या बदलीला महत्त्व देत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देखील वझेचे समर्थन करत आहेत. अशामुळे अनेक वाझे तयार होतील, अशी खंत राणे यांनी व्यक्त केली. आज मुंबई पोलिसांचा स्वार्थासाठी वापर होत आहे. राज्यात अशाच आत्महत्या होणार असतील, मुडदे पडणार असतील तर अशा घटना रोखल्या जाव्यात, यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिल्याचे सांगितले.
राष्ट्रपती राजवट लागू करा -
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. जनता सुरक्षित नाही, निरपराध लोकांची हत्या, महिलांच्या हत्या होऊन आत्महत्या दाखवले जात आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीची चौकशी व्हावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली असून हे राज्य हाताळण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केल्याचे राणे म्हणाले.
हेही वाचा - अंबानीसाठी भाजपाने महाराष्ट्राच्या विधानसभेचा वापर केला, नाना पटोलेंची टीका