मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांचे संतुलन बिघडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, त्यांच्याबद्दल जर काय बोलाल तर जीभ जागेवर राहणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांना दिला. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे संजय राऊत मागत आहेत, ते पुरावे मागणारे कोण? असा सवालही राणेंनी यावेळी केला. तसेच सध्याच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
संजय राऊतांना सत्तेचा माज
संजय राऊत यांच्यावर नारायण राणेंनी आज जोरदार प्रहार केला. विकासकामाबद्दल बोला, तुम्ही महाराजांच्या वंशजाबद्दल बोलाल तर याद राखा, तुमची जीभ जागेवर राहणार नसल्याचा इशारा राणेंनी राऊतांना दिला. संजय राऊतांना सत्तेचा माज आला आहे. शिवसेनेने स्वार्थासाठी, मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड केली आहे. शिवसेनेला हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही राणे म्हणाले. त्यांनी यापुढे महारांबद्दल आणि त्यांच्या वशंजाबद्दल असे बोलण्याचे धाडस करु नये, असेही राणे म्हणाले.
इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचाही नारायण राणेंनी निषेध केला. ते बोलले ते लोक विसरणार नसल्याचे राणे म्हणाले. इंदिरा गांधीबद्दल एवढे बोलूनही काँग्रेसवाले गप्प का? असा सवालही राणेंनी यावेळी केला.
उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या मताशी सहमत आहेत का?
संजय राऊत काहीही बोलत आहेत मात्र, उद्धव ठाकरे त्यावर काहीच बोलत नाहीत. त्यांना बोलण्यापासून रोखत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे राऊतांच्या वक्तव्याशी सहमत आहेत का? असा संशय येत असल्याचे राणे म्हणाले.