मुंबई - मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी निर्णयाप्रत आली होती. पण, महाविकास आघाडीच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयात नीट वकील देता आला नाही. त्यांना मराठा आरक्षण द्यायचे नव्हते, म्हणूनच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली, अशी घणाघाती टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांनी केली.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्याचे सर्व खापर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडले. मराठा आरक्षणासाठी चांगला वकील या लोकांनी केला नाही, केवळ नात्यागोत्यातील वकील दिले, असा आरोपही त्यांनी केला.
राज्य विधिमंडळाच्या दोन दिवस झालेल्या पावसाळी अधिवेशनावरही नारायण राणे यांनी कडाडून टीका केली. या अधिवेशनात राज्यातील जनतेला दिलासा मिळेल, असा कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही किंवा त्यावर चर्चाही झाली नाही, असे ते म्हणाले. केवळ विधेयके मंजूर करून घेतली. यामुळे सरकारला यापुढे अधिवेशनात घ्यायची नियतीने वेळ दिली तर, ते मातोश्रीच्या गच्चीवर घ्यावे, असा टोला राणे यांनी लगावला.
मातोश्रीला दाऊदकडून आलेल्या धमकीबदल राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. त्यांना कोण धमकी देणार, असा सवाल केला. त्यांच्यात धमकी देण्यासारखे आहे काय, अशी टीकाही केली. केवळ सुशांतसिंह प्रकरण हे खून म्हणून उघड होऊ नये, यासाठी हा सर्व खटाटोप चालला आहे आणि त्यामुळेच कंगनावर, तिच्या घरावर कारवाई करणे आदी प्रकार सुरू आहेत, असेही राणे म्हणाले. इतकेच नव्हे तर, उद्धव ठाकरे हे सुशांतसिंह प्रकरणाला घाबरले असल्याचा दावाही त्यांनी केला.
दाऊद यांना फोन करणार नाही आणि यांना कोण मारणार नाही. बाळासाहेब हे दाऊदवर बोलायचे, पण हे साधा त्याचा उच्चार सुद्धा करत नाहीत आणि तशी हिंमत त्यांच्यात नाही, अशी टीकाही राणे यांनी केली. तसेच मातोश्रीला दाऊदची धमकी येणे, हा केवळ बहाणा आहे. मात्र, याच काळात मलाही न्यूझीलँड येथून सेनेला मदत करा म्हणून फोन आला होता आणि तो फोन त्याच दिवशी आला होता. त्यामुळे हे सगळे खोटेनाटे सुरू असल्याचे राणे म्हणाले.
कंगनाच्या वक्तव्याचा आपण समर्थन करत नाही. पण, तिच्यावर राग काढला जातोय. ती चुकीचे बोलली असेल, त्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल राणे यांनी केला. कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईचा समाचार घेत राणे म्हणाले की, सेनेने मुंबईत सर्वात जास्त अनधिकृत बांधकामे केली आहेत. ज्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना हिच्यावर हक्कभंग उपस्थित केला, त्यांची ठाण्यात किती अनधिकृत बांधकामे आहेत हे तपासा, असे राणे म्हणाले.
कोरोना आणि राज्यातील गोरगरीब प्रश्नाच्या संदर्भात उद्धव ठाकरे एक शब्दही बोलले नाही. विदर्भाला फक्त सोळा कोटी दिले, तेही आजपर्यंत मिळालेले नाहीत. कोकणात सुद्धा नैसर्गिक संकट आले, त्याची मदत हे अद्याप मिळाली नाही. मात्र, उद्धव ठाकरे हे सभागृहात बोलले, त्यापेक्षा एखाद्या गावचा सरपंच चांगला बोलला असता, अशी टीकाही राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
हेही वाचा - 'कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्याची ही वेळ नव्हती, तिला गांभीर्याने घेण्याची गरज नाही'