मुंबई - शिवसेना भाजप युतीच्या घोषणेनंतर नाणार रिफायनरी कृती समितीने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत उद्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये नाणार प्रकल्प रद्द करण्याचा अध्यादेश पारित होईल, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिल्याचे नाणार रिफायनरी कृती प्रकल्पाचे नेते अशोक वालम यांनी सांगितले.
सोमवारी युतीच्या घोषणेवेळी नाणार प्रकल्प रद्द केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तोंडी आश्वासन नको, लेखी अध्यादेश काढा, या मागणीसाठी आज नाणार रिफायनरी कृती समितीने मातोश्री गाठले. शेतकऱ्यांच्या सातबारावर लागलेला स्टॅम्प काढून देण्यासाठी लेखी अध्यादेश काढून घ्यावा, अशी नाणार रिफायनरी प्रकल्प समितीने मागणी केली, त्यावर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया देत यावर आज मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणार असल्याचे देखील सांगितले.