मुंबई Nana Patole On Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चिघळण्यासाठी भारतीय जनता पक्षचं कारणीभूत असल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. भाजपा आरक्षण विरोधी पक्ष असून त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. केंद्रात 9 वर्षांपासून भाजपाचं सरकार आहे, पण त्यांनी निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) देण्याची भाजपाची प्रामाणिक इच्छा असेल तर संसदेच्या विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, अशी मागणी नाना पटोले यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केली.
आरक्षणाची मर्यादा हटवावी लागेल : मराठा समाजासह मागास समाजांना आरक्षण द्यायचे असेल तर सध्याची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागणार आहे. ही मर्यादा हटवण्याचे अधिकार केंद्र सरकारकडं आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकरानं ही मर्यादा हटवण्याची गरज आहे. मात्र केंद्रातील भाजपा सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ही मर्यादा हटवण्याचा निर्णय घेत नसल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. भाजपानं मराठा व धनगर समाजाला खोटं आश्वासन देऊन सत्ता हस्तगत केली, मात्र सत्तेवर आल्यानंतर भाजपानं 'या' समाजाच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला. विधानसभेत घाईगडबडीत मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात आला, पण तोही सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. मराठा समाजाला मीच आरक्षण देऊ शकतो, अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण सत्तेत येऊन दीड वर्ष झाले, अजून मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, असेही ते म्हणाले.
मविआ सरकारवर खापर फोडण्याचा प्रयत्न : मराठा आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडण्याचा प्रयत्न भाजपानं केला आहे. भाजपाचा हा प्रयत्न हास्यास्पद असून न्यायालयात टिकणारं आरक्षण दिलं, असा दावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मग ते आरक्षण न्यायालयात का टिकलं नाही? असा सवालही नाना पटोले यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी बोलून मराठा आरक्षणाचा नवव्या सूचीत समावेश का केला नाही ? असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.
मंत्र्यांच्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय नाही : मुळात भाजपाला आरक्षण द्यायचे नाही हे स्पष्ट असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. मंत्र्यांच्या उपसमितीच्या बैठकीतून कोणताही ठोस निर्णय सरकारनं जाहीर केला नाही. सरकारनं समाजासाठी काही निर्णय घेतले, याची यादी वाचून दाखवण्यात आली. मात्र मराठा समाजाला आरक्षण कसं देणार, यावर एक शब्दही सरकारनं काढला नाही. विरोधी पक्षांवर आरोप करुन काहीही साध्य होणार नाही, असी टोलाही नाना पटोले यांनी यावेळी लगावला.
हेही वाचा :