मुंबई - विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह पटोलेंनी शनिवारी अध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज भरला, तर भाजपकडून किसन कथोरे हे विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत.
हेही वाचा - शासनाकडून कायद्याची, घटनेची पायमल्ली, शपथविथी नियमबाह्य - चंद्रकांत पाटील
विधीमंडाळामध्ये महाविकास आघाडी सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांनी आपला अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पटोलेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे काम करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. अर्ज दाखल केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा - जयंत पाटील आज राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार
तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी नाना पटोलेंचा अर्ज भरला असून पाटोले यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. सभागृहातील कामकाज सुरळीत करताना त्यांच्या अनुभवाचा लाभ सरकारला तसेच विरोधकांना होईल, असे मत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे, तर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले होत असल्याने मला त्याचा विशेष आनंद आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आजवर मोठा लढा दिला आहे, असे राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल म्हणाले. तसेच त्यांनी पटोलेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - प्रथा परंपरा मोडण्याचा पायंडा भाजपनेच पाडला - नवाब मलिक
महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष पदासाठी एकमताने नाना पटोले यांचे नाव निश्चित केले आहे. ते आता विधानसभेच्या सर्वोच्च ठिकाणी जात आहेत. याचा काँग्रेसला आनंद आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणाले.