मुंबई - विधीमंडळात 'सीएए'च्या मुद्यावरून सत्ताधारी-विरोधकात जोरदार गदारोळ झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांना सभागृहाबाहेर काढण्याचा दम दिला. सांगूनही भाजपचे मंत्री गिरीश महाजन टिप्पणी करत होते. त्यावेळी नाना पटोलेंनी 'गिरीश तुला बाहेर जायचे का?' काढू का? असे म्हणत त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. पटोलेंच्या या पवित्र्यानंतर मात्र काही मिनिटे का होईना सभागृह शांत राहिले.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान झालेला गदारोळ वाढला तो माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या भाषणापासून. मुनगंटीवारांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री नवाब मलिक यांच्या नावांचा उल्लेख केल्याने सत्ताधारी पक्षाचे विशेषतः राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार आक्रमक झाले. तेवढ्यात विरोधी भाजपचेही आमदार समोरासमोर आल्याने सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. आमदार आपल्या जागेत बसावे, शांत रहावे, अशा सूचना पटोले वारंवार करीत होते; तरीही सगळीच गोंधळ घालत अनेकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत होते. त्यानंतर आपल्या जागेत उभे राहून पटोले म्हणाले, 'आता हे मी खपवून घेणार नाही. बोलणाऱ्या (गोंधळ घालणाऱ्या) आमदारांनी बाहेर काढेल' असा इशारा पटोलेंनी दिला.
नाना पटोलेंनी सूचना देऊनही पुढच्या बाकांवर बसलेले गिरीश महाजन काही तरी बोलत होते. तेव्हाच महाजनांकडे नजर वळून गिरीश तुला बाहेर जायचे का? काढू का,' असा दमच पटोलेंनी महाजनांना भरला. त्यानंतर मात्र काही काळ सभागृह शांत झाले. मात्र, काही वेळाने पुन्हा आरोप-प्रत्यारोपाने गदारोळ झाला. अर्ध्या तासासाठी कामकाज थांबविण्याचा निर्णय घेत पटोले आपल्या दालनात गेले.