मुंबई- एपीआय सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात सापडलेल्या स्कॉर्पिओ कार यासंबंधी आणि संशयित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या मुद्यावर मुख्यमंत्री आणि पटोले यांच्यात चर्चा झाली.
सगळ्यात आधी पंतप्रधानांचा राजीनामा मागायला पाहिजे
महाविकास आघाडी म्हणून नेमके या मुद्द्याला विरोधकांना कस सामोरं जायचे यासंबंधी या बैठकीत चर्चा झाली. सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मालिन होत असल्याचे देखील यावेळी नाना पटोले यांनी सांगितले. जवळ जवळ अर्धा तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यात चर्चा झाली असून वीज बिल विषयावर देखील या बैठकीत चर्चा झाली आहे. सामान्य वीज ग्राहकांना विजबिलात सवलत देता येईल का? याचा देखील आढावा या बैठकीतून घेण्यात आला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधक राजीनामा मागत आहेत. विरोधक हे प्रत्येक मुद्द्यावर राजीनामे मागू लागले आहेत. ज्या प्रकारे विरोधक राजीनाम्याची मागणी करत आहेत त्यानुसार सगळ्यात आधी पंतप्रधानांचा राजीनामा मागायला पाहिजे, असा टोला आहे नाना पटोले यांनी भाजपला लावलाय.