मुंबई - राफेल लढाऊ विमान खरेदीत प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केले होते. राफेल लढाऊ विमान खरेदी करारानंतर 'दसॉल्ट' कंपनीने भारतीय मध्यस्थाला एक दशलक्ष युरोंची लाच दिल्याचे फ्रान्समध्ये सुरू असलेल्या चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे 'चौकीदार ही चोर है' हे सिद्ध झाले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काय म्हणाले नाना पटोले -
भारत आणि फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत २०१६ मध्ये करार झाला. त्यानंतर 'दसॉल्ट' कंपनीने भारतातील मध्यस्थाला एक दशलक्ष युरो एवढी रक्कम दिली. २०१७ मध्ये दसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून 'गिफ्ट टू क्लाएंट' म्हणून ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था एफए(AFA)ने दसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. यावरून राफेल खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. राहुल गांधी व काँग्रेस पक्षाने सातत्याने मागणी केल्याप्रमाणे या खरेदी कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी केल्यास या प्रकरणाचे सत्य समोर येईल. सर्व देशाला खरे चोर सापडतील, असे नाना पटोले म्हणाले.
काय आहे राफेल घोटाळा -
23 सप्टेंबर 2016 रोजी भारताने फ्रान्सकडून 36 राफेल जेट विमाने विकत घेण्याचा करार केला होता. त्याची प्रक्रिया मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळातच सुरू झाली होती. फ्रान्स दौऱ्यावर असताना 10 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान मोदींनी एक घोषणा केली. राफेलकडून 36 लढाऊ विमाने विकत घेण्याची घोषणा त्यांनी केली होती. यानंतर अंदाजे वर्षभरानंतर सप्टेंबर 2016मध्ये करार करण्यात आला आणि त्यानुसार 59 हजार कोटी रुपयांमध्ये 36 विमाने घेण्याचे ठरले होते. जेव्हा काँग्रेसनं राफेल कराराच्या अटी ठेवल्या होत्या तेव्हा एका विमानाची किंमत 526 कोटी रुपये ठरवण्यात आली होती. भाजप सरकारच्या काळात हीच एका विमानाची किंमत 1 हजार 570 कोटी रुपये ठरवण्यात आली. त्यामुळे या खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.
हेही वाचा- सीएसएमटी स्थानकात वाझेच्या लोकल प्रवासाचे रिक्रिएशन