मुंबई - कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे अनेक ठिकाणी कामे बंद करण्यात आली आहेत. याचा फटका नाक्यांवरील मजुरांना बसला आहे. दिवसभर नाक्यावर बसूनही काम मिळत नसल्याची खंत विक्रोळी पश्चिम येथील नाका कामगारांनी व्यक्त केली. कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली असल्याची भावना या कामगारांनी व्यक्त केली.
शहरातील नाक्यांवर दररोज सकाळी शेकडो महिला आणि पुरुष रोजगाराच्या शोधात उभे राहतात. नाका कामगारांना शहरातील इमारतींच्या बांधकामासाठी, झोपडपट्टीतील छोटे-मोठे खोदकाम, लाईट फिटिंग, रंगकाम, प्लंबिंग अशी 300 ते 400 रुपये रोजाची कामे मिळतात. मात्र, मागील चार ते पाच दिवसांपासून मुंबईत कोरोना विषाणूचा विळखा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रोज वेगवेगळ्या इमारतीत आणि घरी कामाला जावे लागणाऱ्या नाका कामगारांना सध्या कोणी काम देत नाही.
हेही वाचा - EXCLUSIVE : 'कोरोना' उद्रेक, अन् चीनमधील अनुभव.. पाहा विशेष मुलाखत!
शाळांना सुट्टी देण्यात आल्याने मुले दिवसभर घरीच थांबत आहेत. यामुळे घरखर्चात वाढ झाली असल्याचे विक्रोळी पार्क साईट येथील नाका कामगार म्हणाले. नाका कामगारांना रोजगार हमी योजनेप्रमाणे काम मिळत नाही. आठवड्यातून दोन-तीन दिवस काम मिळते. त्यातूनच घरखर्च चालवावा लागतो. मात्र, या विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत असल्याने त्यांना काम मिळणे कठिण झाले आहे. सर्व कामे ठप्प झाल्याने नाका कामगार मोठ्या चिंतेत आहेत, अशी माहिती नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेश राठोड यांनी दिली.