मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई ( Ramai Ambedkar ) यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रसुतिगृहाच्या नामकरणासोबतच आधुनिकीकरणाचा विषयसुद्धा आमच्या अजेंडामध्ये असून येत्या पाच वर्षात आम्ही प्रसूतिगृहाचे अत्याधुनिक सोयी सुविधेसह आधुनिकीकरण करू, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. B. R. Ambedkar ) यांनी समाजातील श्रेष्ठ-कनिष्ठ भेदाभेद नष्ट करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांचा हा सिद्धांत पुढे नेऊन सामाजिक विकास साधायचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले ( Union Minister Ramdas Athawale ) यांनी केले.
संविधानाच्या रूपाने उपकार -
नायगाव येथील प्रसूतिगृहाचे 'त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर प्रसूतिगृह' असा नामकरण समारंभ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते १५ फेब्रुवारीला करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अनेक वेदना सहन केल्यानंतर सांभाळणारी आई माझी माता रमाई आहे. माता रमाईला आम्ही कधीही विसरू शकणार नाही. मुंबई महानगरपालिकेने नामकरणाचा चांगला निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगून महानगरपालिकेचे आभार मानले.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, हा कार्यक्रम आगळा-वेगळा असून या प्रसूतिगृहाला चांगले नाव दिले आहे. संविधानाच्या रूपाने आम्हा सर्वांवर बाबासाहेबांचे अनंत उपकार असून संपूर्ण जगात डॉ. बाबासाहेबांच्या उल्लेखनीय कामांची नोंद आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. डॉ. आंबेडकरांमुळे महिलांना प्रसूती रजा मंजूर झाली. ग्रंथ कमी पडतील इतके उत्तुंग काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. मला सोन्याचे दागिने नको, कुंकू हेच माझे दागिने आहे, असा अमूल्य विचार माता रमाई यांचा असल्याचे महापौरांनी नमूद केले.
हेही वाचा - Narayan Rane on Sanjay Raut : उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर संजय राऊत यांचा डोळा - नारायण राणे
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव म्हणाले की, माता रमाई हे आपले दैवत आहे. या प्रसूतिगृहाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहेत. आम्हाला अपेक्षित असलेले प्रसूतिगृह आधुनिकीकरणासह लवकरच उभे राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
माता रमाबाई यांचा पदस्पर्श -
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. आज आनंदाचा दिवस असून नामकरणासाठी आपण सर्व एकत्र जमलो आहोत. हे प्रसूतिगृह स्थानिक नागरिकांना अल्पदरात आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी १९५० मध्ये सुरू करण्यात आले होते. गत ७२ वर्षात याठिकाणी ०१ लाख २५ हजार इतक्या संख्येने प्रसूती झाली आहे. कोरोना काळात बाधित असलेल्या गर्भवती महिलांवर उपचार व प्रसूतीची सुविधा या ठिकाणी करण्यात आली होती.
या संपूर्ण काळात एकही नवजात शिशू दगावले नाही. ही मोठी कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी ४२ हजार नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. माता रमाबाई यांचा पदस्पर्श या प्रसूतिगृहाला झाला असल्यामुळे येथील नागरिकांच्या मागणीप्रमाणे प्रसूतिगृहाचे नामकरण करण्यात आल्याचे काकाणी यांनी नमूद केले.