मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी प्रज्ञा सिंगला कोर्टात गैरहजर राहण्याबद्दल विशेष न्यायालयाने फटकारले आहे. साध्वी प्रज्ञा सिंगच्या वकिलांनी कोर्टात निवेदन दिले होते. या निवेदनात साध्वी प्रज्ञा सिंगला ७ जूनपर्यंत न्यायालयात गैरहजर राहण्याची मुभा मिळावी, अशी विनंती करण्यात आली होती.
सुनावणीत साध्वी प्रज्ञा सिंगच्या वकिलांकडून कोर्टात निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात साध्वी प्रज्ञा सिंगने न्यायालयाला विनंती करीत म्हटले आहे, की मी लोकसभा निवडणुकीत भोपळमधून खासदार म्हणून निवडून आले आहे. मला काही महत्वाच्या कामांमुळे विशेष न्यायालयात सुनावणीसाठी गैरहजर राहण्यासाठी ७ जूनपर्यंत मुभा मिळावी, अशी विनंती साध्वीने केली होती. यावर विशेष न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत साध्वीच्या वकिलांमार्फत करण्यात आलेली विनंती फेटाळली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर रहावेच लागेल. आठवड्यातील कुठलाही दिवस आरोपींनी ठरवावा असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाच्या या आदेशाचे पालन न करणाऱ्या आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याचे संकेतही न्यायालयाने यावेळी दिले आहेत. दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोटातील जामिनावर सुटलेल्या आरोपींनी यापुढे आठवड्यातून एकदा कोर्टात हजर रहावेच लागणार आहे. कोर्टात एखाद्या तारखेला आरोपी गैरहजर राहणार असेल तर त्यासाठी आरोपींकडून सबळ कारण कोर्टाला सांगावे लागेल. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती विनोद पाडाळकर यांनी सुनावणीत म्हटले होते.
मालेगाव बॉम्बस्फोटा संदर्भात प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदीप डांगे यांच्याविरोधात खटला सुरू आहे. यापैकी साध्वी प्रज्ञा सिंग व कर्नल प्रसाद पुरोहित हे सध्या विशेष न्यायालयाच्या सुनावणीस गैरहजर राहत आहेत. या संदर्भात पुढील सुनावणी ४ जूनला होणार आहे.