मुंबई - नागपुरात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनी तातडीनं बैठक घेत या व्हायरसपासून बचाव करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आहेत. नागपुरातील ज्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झालीय, त्या रुग्णाच्या कुटुंबीयांची आज तपासणी केली जाणार आहे. तसेच या रुग्णासोबत प्रवास करणारे आणि संपर्कात आलेले ४ जण नॉर्मल असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
जगभरात थैमान घातलेला कोरोना व्हायरस आता आपल्या देशातही आला आहे. मुंबईतही कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून, त्यांच्यावर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असलेल्या पालिका प्रशासनानाने आपली यंत्रणा सज्ज केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसोलेशनच्या बेडच्या संख्येत वाढ केली आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाच कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने अशाच रुग्णांनी रक्ताची चाचणी करून घ्यावी उगाच रुग्णालयात गर्दी करू नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.