मुंबई - नाफेड तूर खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना त्यांची जात विचारल्याचा मुद्दा गुरूवारी विधान परिषदेत गाजला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या जात विचारल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे जात विचारली जाऊ नये. संबंधितांना यासाठी निर्देश दिले जातील, अशी ग्वाही सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. सुरजित सिंह ठाकुर यांनी विधान परिषदेत हा विषय मांडला होता.
नाफेडच्या केंद्रात शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्यासाठी दिलेल्या फॉर्ममध्ये जातीचा उल्लेख करावा लागत आहे. राज्य सरकारकडून होत असलेला हा प्रकार निंदनीय असल्याचे ठाकूर म्हणाले. त्यावर दिवाकर रावते यांनी नाफेड ही केंद्र सरकारची यंत्रणा असून तेथे होत असलेल्या प्रकाराला राज्य सरकारला दोष देण्यात अर्थ नाही, असे सांगितले.
तेव्हा शेकापचे जयंत पाटील यांनी नाफेड ही केंद्र सरकारची यंत्रणा असली तरी तिची अंमलबजावणी राज्य सरकारकडूनच केली जात असल्याचे निदर्शनास आणले. तेव्हा या सर्व बाबी तपासून घेऊ आणि संबंधितांना योग्य ते निर्देश दिले जातील, असे सभापती निंबाळकर यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण -
नाफेड केंद्रामार्फत तूर खरेदी केली जात आहे. या केंद्रावर शेती मालाची विक्री करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. १५ मार्चपर्यंत नोंदणी केली जाणार आहे. मात्र नोंदणी करताना शेतकऱ्यांची माहिती भरताना फॉर्ममध्ये शेतकऱ्यांना जात विचारली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या जात असून शेतकर्यातून संताप व्यक्त केला जात आहे. जातीचा उल्लेख असलेला रकाना रद्द करण्याची मागणी शेतकर्यांतून केली जात आहे.