मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात बोलताना फोन टॅपिंगचे गंभीर आरोप केले. '२०१६-१७ मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला होता. तेंव्हा मी खासदार होतो, असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांच्यासाठी अमजद खान, असा कोड वापरण्यात येत होता, असेही ते म्हणाले. त्यासोबतच रावसाहेब दानवे स्विय साहायक, तसेच खासदार संजय काकडे यांचाही फोन टॅप करण्यात आला होता, अशी माहितीही नाना पटोलेंनी दिली. नाना पटोलेंच्या या आरोपानंतर सभागृहातील अनेक सदस्यांनी या प्रकणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.
गृहमंत्र्यांनी याची चौकशी करावी - जयंत पाटील
केंद्रीय संस्था जर सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम करत असतील, तर त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे केली. अलीकडच्या काळात वर्तमानपत्रात आणि विरोधी पक्षातील लोकांकडून 'याला ईडी लावतो, त्याला सीबीआय लावतो' अशी विविध विधाने ऐकायला मिळतात. त्यामुळे विधानमंडळाचा सदस्यांच्या फोन टॅप होत असेल तर सभागृहातील सदस्यांचे संरक्षण करणे, ही आपली जबाबदारी आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
उच्चस्तरीय चौकशीचे गृहमंत्र्यांचे आदेश -
या संदर्भात बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नाना पटोले यांनी केलेले फोन टॅपिंगचे आरोप गंभीर असल्याचे म्हटले. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी केली. यासोबतच याप्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - कोर्टात जाऊन भाजपला काही फायदा होईल असे वाटत नाही - छगन भुजबळ