मुंबई- डॉक्टर, इतर आरोग्य सेवक तसेच पोलीस यांच्याप्रमाणेच विविध महापालिकांचे कर्मचारी देखील कोरोना योद्धेच ठरले आहेत. महामारीपासून सर्वसामान्यांचा बचाव करण्यासाठी हे सर्व योद्धे जिवाचे रान करत आहेत. पण कोरोनाचा विळखा या योद्ध्यांनाही बसला आहे. त्यात विविध पालिकांच्या कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. यासंर्भात 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला विशेष आढावा.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने मुंबईला हॉटस्पॉट बनवले. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या, शहरात स्वच्छता राखणाऱ्या सफाईचे कामगारांसह मुंबई महापालिकेच्या तब्बल 2 हजार 686 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 106 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पालिकेच्या एका उपायुक्ताचा तसेच एका सहाय्यक आयुक्ताचा समावेश आहे.
प्रत्येक कार्यात योद्ध्यांचा सहभाग...
कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स यांसारख्या कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. मुंबईत स्वच्छता ठेवण्याचे काम पालिकेचे सफाई कर्मचारी करत आहेत. तर मुंबईकरांना पाणी पुरवठा करण्याचे काम पालिका कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात गरीबांना दररोज जेवणाची पाकीटं पोहचवण्यासह औषध फवारणीचे कामही पालिका कर्मचारी करत आहेत.
मृतांमध्ये सफाई कामगारांची संख्या अधिक...
महापालिकेच्या 106 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसाला 50 लाख रुपये आणि अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुण्यात 255 पालिका कर्मचारी कोरोनाबाधित...
पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजारावर जाऊन पोहोचलीय. हे संकट आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन कर्मचारी अहोरात्र झटत आहेत.या कर्मचाऱ्यांच्या कोरोनाची लागण होऊ नये यासाठी पालिकेनेही वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. असे असतानाही आतापर्यंत महापालिकेचे 255 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक 36 इतकी आहे. तर, यातील 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. यामध्ये आठ सफाई कामगारांचा समावेश आहे. यात सहा महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास मयतांच्या वारसांना एक कोटी रुपये आणि महापालिकेत नोकरी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे.
ठाणे पालिकेच्या कामकाजावर परिणाम...
ठाण्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे, यामुळे ठाणे पालिकेचे 365 आणि महसूल विभागाच्या 18 कर्मचारी बाधित झाले आहे यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला असून त्यांना आता मनुष्यबळ कमी पडत असलयामुळे दररोज कंत्राटी पद्धतीने भरती सुरू आहे. पालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचारी डॉक्टर सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन, महसूल, परिवहन अशा विविध विभागांतील अनेकांना कोरोनाची लागण झालेली आहे. यामध्ये 10 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
अनेकांची कोरोनावर मात...
आतापर्यंत नाशिक पालिकेत काम करणाऱ्या 34 जणांना कोरोची लागण झाली होती. मात्र या कोरोनायोद्ध्यांनी कोरोनावर मात केली अअसून यातले बरेच जण कामावर रुजू देखील झाले आहेत. कोरोना कक्षात काम करणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांची काळजी घेत असून पीपीई किट्स, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज् आणि सॅनिटीझर यांचा पुरेपूर साठा सर्व हॉस्पिटलमध्ये करण्यात आला आहे. तसेच कोरोना कक्षात काम करणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांना 14 दिवसानंतर 7 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत असून त्यांच्या जागेवर इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे.