मुंबई जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई आणि परिसरातील कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची सतत वाढत जाणारी संख्या पाहता रुग्णालये कमी पडणार असल्याने पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयांमधील आरोग्य सेवेची गरज नसणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन रुग्णालये रिक्त कण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालये आणि त्यामधील कर्मचारी सज्ज ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.
हेही वाचा - शेअर बाजार सुरळीत सुरुच राहणार, गुंतवणूकदार तज्ञानी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे केले स्वागत
राज्यात कोरोना विषाणूबाधित 52 तर, मुंबई आणि मुंबई परिसरात कोरोना 21 विषाणूबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 17 मार्चला एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर सध्या कस्तुरबा रुग्णालयातून 83 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या रुग्णालयात 122 तर, जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात 5 असे एकूण 127 रुग्ण भरती आहेत. कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशनचे 127 बेड असून त्यावर सध्या 122 रुग्ण आहेत. या रुग्णालयात कोरोनाची लागण झालेले आणि संशयित असे रुग्ण मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे बेडची कमतरता भासणार आहे. त्यासाठी पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात आयसोलेशन बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत.
पालिकेकडे सध्या असलेल्या बेडची क्षमता येत्या काही दिवसात संपणार आहे. सध्या वाढणाऱ्या रुग्णांची आकडेवारी पाहता येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात आयसोलेशन वॉर्ड आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी परेल येथील केईएम आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय रिक्त करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या रुग्णांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नाही, अशा रुग्णांना घरी पाठवून ते बेड कोरोनाच्या बाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा - कोरोना विशेष: भारत तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर.. अंनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची माहिती