मुंबई - देशाचा विकास लोकप्रतिनिधी करतात असे बोलले जाते. मात्र लोकप्रतिनिधीसोबत एखादा चांगला सनदी अधिकारी नसेल, तर देशाचा विकास होऊ शकत नाही. अशाच उत्कृष्ट काम करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची म्हणजेच आयएएस अधिकाऱ्यांची निवड फेम इंडिया (मॅगझीन) आणि एशिया पोस्ट यांनी केली आहे. या यादीत मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्यासह महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा सामावेश आहे.
राष्ट्र निर्माणात आपली चांगली भूमिका निभावणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचा निर्णय फेम इंडिया मॅगझीन द्वारे एशिया पोस्ट यांच्या सहकार्याने घेण्यात आला होता. 2019 पासून हा पुरस्कार दिला जात आहे. देशभरामध्ये 5000 आएएस अधिकारी काम करत आहेत. त्यापैकी 1984 ते 95 बॅच मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या 200 आयएएस अधिकार्यांची नावे निश्चित करण्यात आली होती. त्यामधून 50 अधिकाऱ्यांच्या नावांची निवड करण्यात आली. या यादीत महाराष्ट्र राज्यातील 3 अधिकाऱ्यांची नावे आहेत.
1986 बॅचचे मनु कुमार श्रीवास्तव, 1988 बॅचचे अरविंद सिंह तर 1989 बॅच च्या इकबाल सिंग चहल यांची निवड झाली आहे. इकबाल सिंग चहल यांनी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असताना महापालिका आयुक्त पदाची सूत्र हाती घेतली होती. पालिका आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यावर चहल यांनी कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमधील कोरोना रोखण्याचे काम चहल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. धारावी पॅटर्नची दखल जगभरात घेण्यात आली. चहल यांना नुकताच “कोविड क्रुसेडर्स ॲवॉर्ड २०२०” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.