मुंबई: ऐतिहासिक अशा गेट वे ऑफ इंडियाचे (Gate Way Of India) सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांना अडचणी येतात. या अडचणी दूर करण्याचा आणि या विभागाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. यामुळे कोणत्याही अडचणीविना पर्यटकांना गेटवे ऑफ इंडियाचे सौंदर्य पाहता येणार आहे.
पर्यटकांना येणाऱ्या अडचणी- मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून कुलाबाकडे जाताना गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू आहे. या वास्तूच्या बाजूलाच पंचतारांकित ताज हॉटेल आहे. या हॉटेलवर पाकिस्तानी आतंकवादी कसाबने आपल्या साथीदारांच्या सहाय्याने आतंकी हल्ला केला होता. त्यानंतर संपूर्ण दगडी असलेल्या गेट वे ऑफ इंडिया या इमारतीच्या बाजूने सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी कुंपण घालण्यात आले आहे. गेटवे ऑफ इंडिया येथुन अलिबाग आणि मांडवा येथे जाण्यासाठी बोटी आणि फेरी बोट सुटतात. यासाठी तिकीट खिडक्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून तपासणी केली जाते. यामुळे गेट वे ऑफ इंडियाचे सौंदर्य अनुभवताना पर्यटकांना अडचणी येतात. यासाठी पालिकेने या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
१४ कोटींचा खर्च- गेट वे ऑफ इंडिया येथे प्रवासी बोटींच्या तिकीटासाठी असणाऱ्या खिडक्या हटवल्या जाणार आहेत. या ठिकाणांहून एलिफंटा, नवी मुंबई, मांडवा येथे जाणाऱ्या बोटी निघतात. सध्या अस्तित्वात असलेल्या तिकीट प्लाझामुळे गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व कारंज हे पर्यटकांना दिसत नाही. यामुळे बाजूला असलेल्या पोलीस चौकीजवळ तिकीट खिडक्या उभारण्यात येणार आहेत. यामुळे गेटवे ऑफ इंडिया परिसरात येणाऱ्या पर्यटकांना थेट रस्त्यावरून त्याचे सौंदर्य पाहता येणार आहे. गेट वे ऑफ इंडिया परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदांचा पुतळा असून येथील दगडी कारंजे हेही देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असते. त्याचेही सौंदर्यीकरण केले जाणार आहे. यासाठी पालिकेकडून एम. देवांग कन्स्ट्रक्शन्स कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी पालिका १४ कोटी रुपये खर्च करणार आहे.
काय आहे गेटवे ऑफ इंडिया - गेटवे ऑफ इंडिया दक्षिण मुंबईत आहे. १९११ मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली व १९२४ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. हिची रचना इंडो-सारासेनिक शैलीत केली गेली आहे. बेसाॅल्ट दगडांनी बांधलेली ही कमान २६ मीटर (८५ फूट) उंचीची आहे.