मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आपला कारभार पेपरलेस करण्याकडे भर दिला आहे. याच अनुषंगाने २८ जानेवारी २०१६ नंतर विवाह नोंदणी केलेल्यांना प्रमाणपत्र डिजीलॉकरमध्ये उपलब्ध केले जाणार आहे. केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचा उपक्रम असलेल्या डिजीलॉकर या ऑनलाईन शासकीय व अधिकृत कागदपत्रांच्या ऍपमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करुन दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र येथे जतन करून ठेवणे शक्य असल्याने नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.
यांच्या हस्ते लोकार्पण: महापालिकेने मुंबईकरांसाठी उपलब्ध करून दिलेल्या डीजीलॉकरमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे लोकार्पण पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक शरद उघडे, माहिती तंत्रज्ञान खात्याचे व्यवस्थापक मीनल शेट्ये, डेनिस फर्नांडिस उपस्थित होते.
ओझे कमी करण्याचा प्रयत्न: केंद्र सरकारने नागरिकांना महत्वाची कागदपत्रे पेपरलेस जतन करण्यासाठी डिजीलॉकर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डिजीलॉकरमध्ये जतन केलेल्या कागदपत्रांना प्रत्यक्ष कागदपत्रांइतकाच प्रत्यक्ष कागदपत्रा इतकाच दर्जा आहे. त्यामुळे पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंग चहल यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्रांची सुविधा डिजीलॉकरमध्ये उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांवरील ओझे कमी करून त्यांना महत्त्वाच्या कागदपत्रापर्यंत पोहोचणे सोपे व्हावे, हा महापालिकेचा उद्देश आहे असे आश्विनी भिडे यांनी सांगितले. यापुढे पालिकेच्या इतरही विभागाच्या सेवा डिजीलॉकरमध्ये उपलब्ध करुन देण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे शरद उघडे यांनी सांगितले.
२०१६ पासून ऑनलाईन प्रमाणपत्र: विवाह नोंदणी प्रमाणपत्र हा विवाहितांसाठी महत्वाचे मानले जाते. त्याचा वापर अनेक ठिकाणी पुरावा म्हणून केला जातो. पासपोर्ट, व्हिजा, पती पत्नीच्या मृत्यू नंतर वारस म्हणून या प्रमाणपत्राचा वापर केला जातो. पालिकेने २०१० पासून विवाह नोंदणी ऑनलाईन केली आहे. २०१६ पासून नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करून दिले जात आहे. त्यानंतर आता हे प्रमाणपत्र डिजीलॉकरमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. महापालिकेकडे वैवाहिक नोंदणी ३ लाख ८० हजार ४९४ इतक्या लोकांनी केली आहे.
मॅरेज सर्टिफिकेटसाठी कागदपत्रे: लग्नाचा पुरावा म्हणून मॅरेज सर्टिफिकेट ओळखले जाते. मॅरेज सर्टिफिकेटसाठी वधू आणि वरांचे फोटो आवश्यक असतात. तसेच वधू-वरांच्या आधार कार्डची झेरॉक्स, शाळेच्या दाखल्याचे झेरॉक्स , तीन साक्षीदार व त्यांचे तीन तीन फोटो आणि आधार कार्डचे झेरॉक्स, लग्नपत्रिका आवश्यक असते. लग्नामधील ब्राह्मण सोबतचा एक फोटो लागतो.
हेही वाचा: Mumbai Pune Expressway Toll मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील टोल वाढणार जाणून घ्या कारण