मुंबई - मुंबईतील चाकरमान्यांचे दररोज जेवण पुरविणारे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर जाणार आहेत. सुटी संपेपर्यंत चाकरमान्यांना स्वतःचा डब्बा स्वतःच घेऊन जावा लागणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील विविध कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांना जेवणाचे डबे पोहोचवणारे डब्बेवाले २० एप्रिलपर्यंत सुटीवर जाणार आहेत. त्यामुळे एक आठवडाभर या डबेवाल्यांची सेवा बंद राहणार आहे. २२ एप्रिलपासून डबेवाले कामावर रुजू होणार आहेत.
गावी असलेल्या जत्रा, कुलदैवताची पूजा, धार्मिक कार्य, कुलाचार आणि शेतीच्या पूर्व मशागतीची कामे करावयाची असल्याने डबेवाले सुटीवर जात आहेत. मुंबईचे डबेवाले सुटीवर जाणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचविली आहे. ग्राहकांनी या सुटीच्या कालावधीतील पगार कापू नये, अशी विनंती मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी केली आहे.