मुंबई - संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट लादणाऱ्या चीनकडून आता भारतीय सीमेवर घुसखोरी होत असल्याने संपूर्ण देशभर संताप व्यक्त होत आहे. चीनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवानांना वीरमरण आल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या असून चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची एक मोहीम सोशल मीडियावर चालवली जात आहे.
चिनी तसेच इतर विदेशी बनावटीच्या वस्तूंनी भारतीय बाजारपेठा काबीज केल्या आहेत. या अतिक्रमणाला तोंड देण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी मुंबईतील तरुणांनी एकत्र येत 'स्वदेशी तुझे सलाम' हा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी विदेशी वस्तूंचा वापर टाळून भारतीय वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन तरुणाई सोशल मीडियावर करत आहेत.
या 'स्वदेशी तुझे सलाम' उपक्रमाअंतर्गत तरूण मित्र-मैत्रिणी चीनी बनावटीच्या वस्तू न वापरण्याचे आवाहन करत आहे. त्यासाठी पोस्टर्स, व्हिडिओ आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोहोचवले जात आहेत. ऑनलाईन प्रबोधन मेळाव्यांचे आयोजनही या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी चिनी बनावटीच्या वस्तू विक्रीसाठी न ठेवण्याबाबत त्यांचेही प्रबोधन करण्यात येणार आहे. तरुणाईच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे या उपक्रमाच्या प्रमुख सायली भाटकर यांनी सांगितले.
१२५ कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर सुरू केल्यास भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. तसेच भारतीय वस्तूंचे उत्पादन वाढून लोकांना रोजगारही मिळेल. त्यामुळे 'स्वदेशी तुझे सलाम' उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले जात आहे. यासाठी फेसबुक, इन्स्टाग्रामवरची देखील मदत घेतली जात आहे, असे भाटकर यांनी सांगितले.
चिनी बनावटीच्या वस्तूंनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. या वस्तूंसाठी दर्जाहीन कच्चामाल वापरला जातो. त्यामुळे त्यांची किंमतही कमी असते. परिणामी या वस्तू ग्राहकांना आकर्षित करतात. मात्र, याचा परिणाम स्वदेशी वस्तूंच्या विक्रीवर होतो. त्यांना दर्जा असूनही त्यांची विक्री होत नाही. परिणामी भारतातील अनेक उद्योग बंद पडले आहेत. रोजगाराचे स्रोत कमी झाले आहेत. हा धोका वेळीच ओळखण्याची गरज आहे, असे या उपक्रमाच्या सदस्य असलेल्या निकिता तिवारी यांनी सांगितले.