मुंबई Mumbai Water Price Increase : मुंबईकरांचे पाणी लवकरच आणखी महाग होणार आहे. या संदर्भातील पाण्यावरील कर वाढीचा प्रस्ताव पालिका आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. आयुक्त चहल यांच्या मते, पालिकेच्या कायद्यानुसार दरवर्षी पाण्याचे दर आपोआप 8% वाढतील. नवीन विकास दर 16 जूनपासून लागू होईल असं म्हणल्या जातंय, परंतु अद्याप यावर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत पालिकेनं 1 डिसेंबर 2023 रोजी बैठक बोलावली असून, या बैठकीत चर्चेनंतर अंतिम निर्णय होईल. पालिका दर तीन महिन्यांनी ग्राहकांना पाण्याची बिले पाठवते. यावेळी दरवाढ मंजूर झाल्यास थकबाकीची रक्कम नव्या बिलात जोडली जाईल.
वर्षभरात 100 कोटींचा महसूल मिळणे अपेक्षित : मुंबईतील पाण्याचे दर 8 टक्क्यांनी वाढल्यास पाणी 25 पैसे ते 6 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. याचा परिणाम झोपडपट्ट्यांपासून निवासी इमारती आणि पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत सर्व गोष्टींवर होईल. यातून बीएमसीला वर्षभरात सुमारे 100 कोटी रुपयांचा महसूल मिळणं अपेक्षित आहे. मुंबईतील व्यावसायिक संस्था, उद्योग आणि कारखान्यांना पाणीपुरवठा करणारी पालिका सध्या प्रति हजार लिटर पाण्यासाठी 63.65 रुपये आकारते. मुंबईतील पॉश भागातील रेसकोर्स, थ्री स्टार आणि फाइव्ह स्टार हॉटेल्सनाही वाढीव दरानं पाण्याचं बिल भरावं लागणार आहे, हा दर सध्या प्रति हजार लिटरमागं 101 रुपये इतका आहे.
2012 मध्ये बीएमसीनं केला होता नियम : पालिका प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील बॉटलिंग प्लांट आणि एरेटेड वॉटर मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची किंमत सध्या 1000 लिटर पाण्यामागं 132.64 रुपये इतकी आहे. या आधी 2021 मध्ये 5.29 टक्के आणि 2022 मध्ये 7.12 टक्के पाणी दरात वाढ करण्यात आली आहे. तर, आता 2023 या आर्थिक वर्षात पालिका 8 टक्के दर वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. 2012 मध्ये केलेल्या नियमात बीएमसीनं म्हंटलं होतं की, दरवर्षी पाण्याचे दर जास्तीत जास्त 8% वाढतील आणि ते दरवर्षी 16 जूनपासून लागू होतील. मुंबईकरांना सात तलावांमधून बीएमसी दररोज 3850 एमएलडी पाणी पुरवते.
पालिकेचं म्हणणं काय : याप्रकरणी पालिकेची बाजू विचारली असता, लोकांना ज्या दरानं पाणी दिलं जातं, ते अत्यंत नाममात्र असल्याचं पालिकेनं म्हटलंय. सोबतच लोकांना पाणी देण्यासाठी कितीतरी पट जास्त खर्च पालिका करते. पाणीपुरवठ्यासाठी प्रशासकीय खर्चाबरोबरच ऊर्जा खर्च आणि सरकारी तलावातून घेतलेल्या पाण्यावरील खर्चही वाढलाय. त्याचप्रमाणं शुद्ध पाणी आणि त्यात टाकण्यात येणारी औषधं यांचा खर्चही वाढलाय. त्यामुळं ही दरवाढ करणं गरजेचं असल्याचं पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे.
हेही वाचा -