मुंबई - इमारत हलू लागताच घराबाहेर धाव घेतल्याने मी बचावले, असे इमारत दुर्घटनेत वाचलेल्या फिरदोझ सलमानी यांनी सांगितले. मुंबईतील डोंगरी भागात ४ मजली इमारत कोसळलून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या याठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.
या इमारत दुर्घनेत थोडक्यात वाचलेल्या फिरदोझ यांनी सांगितले, माझ्या घरात आम्ही ८ जण असून मागील १ वर्षांपासून आम्ही येथे भाड्याने राहत आहोत. सकाळी आम्ही सर्व झोपेत होतो. माझा मुलगा हेअर सलूनच्या दुकानात जाण्यासाठी तयारी करत होता. तोच इमारत हलू लागत असल्याचे त्याने पाहिले. सर्वांनी आरडाओरडा करताच मी इमारतीबाहेर धाव घेतली. त्यामुळे मी बचावले.
माझ्या डोक्याला मार लागल्याने मला कोणीतरी बाईकवरून जे. जे.रुग्णालयात दाखल केले. सध्या मी माझी मुलगी, नात नशरा व मुलगा नावेद आम्ही चौघे रुग्णालयात दाखल आहोत. मात्र, माझी सून, नातू व २ भाचे यांचा शोध लागला नसल्याचे फिरदोझ यांनी सांगितले.