मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) ताब्यात असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेची एनआयए कोठडी 7 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने हा निर्णय दिला.
मिठी नदीतून या प्रकरणाशी संबंधित संगणकाचा सीपीयू, डिव्हीआर, प्रिंटर, लॅपटॉप, हार्डडिस्क इत्यादी साहित्य हाती लागले आहे. एका अनोखळी व्यक्तीचा पासपोर्टही वाझेच्या घरी सापडला आहे, त्यामुळे त्यादृष्टीनेही तपास करणे आवश्यक आहे, असा एनआयएकडून विशेष न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. वाझेंवर लावलेल्या आरोपांशी संबंधित 120 टीबीचे सीसीटिव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात सचिन वाझे कुठे गेला?, कुणाला भेटला?, का भेटला? स्फोटकांचे साहित्य कसे गोळा केले? मिठी नदीत सापडेलेल्या वस्तूंद्वारे त्याच्याकडून माहिती मिळवायची आहे, असेही एनआयएकडून न्यायालयात सांगण्यात आले.
हेही वाचा - वाढत्या कोरोनाबाबत तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देताहेत डॉ. तात्याराव लहाने
वाझेंना हृदयविकाराचा त्रास आहे, रविवारी हृदयविकाराचा धक्का बसल्याचे वाझेनी स्वत: न्यायालयात सांगितले. वाझेंना अँजिओग्राफीची गरज असल्याचा दावा त्याच्या वकिलांकडून करण्यात आला. मात्र, यावर वाझेंना योग्य ते उपचार मिळत आहेत, ताब्यात घेतल्यापासून दोनदा 'टूडी इको', रक्त तपासणी करण्यात आली असून वाझेंची प्रकृती ठणठणीत असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने कोठडी ७ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय दिला.