मुंबई : रविवारी मुंबईत देशातील सर्वाधिक 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या मार्च महिन्यात असे दुसऱ्यांदा घडले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, तापमान वाढण्याचे कारण हे वाहता वारा नसणे आहे.
देशातील सर्वाधिक तापमान : भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी आणि सोमवारी उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला होता. सांताक्रूझ वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेत रविवारी अनुक्रमे ३९.४ अंश सेल्सिअस आणि ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आयएमडीचे शास्त्रज्ञ राजेंद्र जेनामनी म्हणाले की, 'या महिन्यात दुसऱ्यांदा मुंबईत देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. या आधी 6 मार्च रोजी सांताक्रूझ (वेधशाळा) येथे 39.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे देशातील सर्वाधिक तापमान होते. तर रविवारी 39.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
पूर्वेकडील वाऱ्यांमुळे तापमानात वाढ : ते म्हणाले की, 12 मार्च रोजी मुंबईसह किनारपट्टीच्या कोकण भागात नोंदवलेले तापमान सामान्यपेक्षा 4 - 6 अंश सेल्सिअसने जास्त होते. जेनामनी पुढे म्हणाले की, 5 ते 7 मार्च दरम्यान तापमान सामान्यपेक्षा 5 - 7 अंशांनी जास्त होते. सर्वसाधारणपणे सकाळी 11.30 ते दुपारी 1 दरम्यान समुद्राच्या वाऱ्यामुळे कोकणात तापमान कमी असते. मात्र, गेल्या सात ते दहा दिवसांत पूर्वेकडील वाऱ्यांमुळे समुद्री वारे उशीराने वाहत आहेत. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. ते म्हणाले की, राजस्थान आणि गुजरातमध्ये तापमान सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकते, परंतु सध्या वादळी ढग आणि अनुकूल वाऱ्यामुळे ते नियंत्रित आहे.
येत्या काही दिवसांत दिलासा : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञा सुषमा नायर यांनी सांगितले की, आता वाऱ्याचे स्वरूप बदलल्याने तापमानात घट होण्याची शक्यता आहे. नायर म्हणाल्या की, 'आता उच्च तापमानापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते कारण सोमवारपासून मुंबईत तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबईतील रात्रीचे तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहिले कारण आयएमडी कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेले किमान तापमान २४.८ अंश आणि २४.१ अंश होते जे सामान्यपेक्षा दोन आणि तीन अंशांनी जास्त होते.