मुंबई - राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत 'अमृत शहरांच्या गटामध्ये' सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने तृतीय स्थान पटकाविले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुरस्कार स्वीकारला.
मुंबई तीसरा नंबर -
माझी वसुंधरा अभियानांतर्गत २०२०- २१ मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेअंतर्गत 'अमृत शहरांच्या गटामध्ये' सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने तृतीय स्थान पटकाविले आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी आपल्या शहराने केलेल्या या कामगिरीबाबत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालयाच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ऑनलाइन पुरस्कार स्वीकारला -
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ऑनलाईन समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आयोजित ऑनलाईन सन्मान सोहळ्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईच्यावतीने हा ऑनलाइन पुरस्कार स्वीकारला.