मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराला वीजपुरवठा करणाऱ्या पावर ग्रीड मध्ये बिघाड झाल्यामुळे तब्बल तीन तास मुंबई विना विजेची चालत होती. याचा थेट परिणाम मुंबईच्या जनजीवनावर झाला होता. सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी मुंबईचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पर्यंत मुंबईचा वीज पुरवठा हा टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आलेली आहे. जसजसा वेळ वाढत जाईल तशी तशी मुंबईतील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर लोकल रेल्वे ही काही काळासाठी ठप्प झाली होती. मात्र, मध्य-पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले असता काही तासातच हार्बर मार्गावर सर्वप्रथम पनवेल तेच सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा बहाल करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पश्चिम मार्ग, मध्य मार्गावर लोकलसेवा बहाल करण्यात आली होती.
सध्या लोकल रेल्वेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी मुंबईची बत्ती गुल झाल्यानंतर याचा फटका अत्यावश्यक सेवेतील असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला. मंत्रालयात काम करणारे संदीप चव्हाण हे सकाळी लवकर घरातून निघाले होते. सकाळी साडेदहा वाजता त्यांना त्यांच्या कार्यालयात पोहचणे गरजेचे होते. मात्र, लोकल रेल्वे ही वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ठप्प झाली असता त्यांना कार्यालयात पोहचण्यासाठी दुपारचे जवळपास दोन वाजले होते. असा काहीसा प्रकार सुरेश यांच्यासोबत घडला. मुंबई महानगरपालिकेत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सुरेश यांना आसनगाव वरून मुंबईला येण्यासाठी ट्रेन धरली असता वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांनाही प्रवासादरम्यान याचा फटका सहन करावा लागला.
मुंबई शहरात असलेली सरकारी कार्यालय, कॉर्पोरेट ऑफिस, मुंबईच्या रस्त्यांवर ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठी लावण्यात आलेले ट्रॅफिक सिग्नल आणि मुंबई शहरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसवण्यात आलेले जवळपास 5 हजार 500 हजार सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा यामुळे बाधित झाले होते. मात्र, युद्धपातळीवर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आल्यानंतर काही तासातच या सर्व सेवा पुन्हा काम करू लागल्या. सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी मुंबईचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पर्यंत मुंबईचा वीज पुरवठा हा टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आलेली आहे. जसजसा वेळ वाढत जाईल तशी तशी मुंबईतील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सोमवारी घडलेल्या या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.