मुंबई Mumbai Air Pollution : राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde on Mumbai Pollution) यांनी एक तातडीची बैठक बोलावली होती. यात हवेची गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठीच्या उपाययोजना ॲक्शन मोडवर राबवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्यात येणार असून, त्यासाठी १००० टॅंकर्स लावून त्यासाठी विशेष पथक नियुक्त करावीत. 'एमएमआरडी'ची बांधकाम स्थळे धुळमुक्त करावीत. अण्टीस्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर करावा, अशा सूचना महापालिका आयुक्तांना यावेळी देण्यात आल्या.
वरिष्ठ अधिकारी हजर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या प्रदूषण संदर्भातील बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त चहल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यावेळी उपस्थित होते.
प्रदूषणविरोधी मोहीम लोकचळवळ व्हावी : यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईसह महानगरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका तसेच राज्य शासनाच्या विविध यंत्रणांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे.
रस्ते धुण्यासाठी टॅंकरची संख्या वाढवा : मुंबईत अनेक ठिकाणी सुरू असलेली बांधकामं, विकास प्रकल्पांची कामं यामुळं धुळीचं साम्राज्य पसरू नये, यासाठी पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावेत. तसेच साचलेली धूळ साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. रस्ते धुण्यासाठी टॅंकरची संख्या १००० पर्यंत वाढवावी, असेही त्यांनी सांगितलं. मुंबईसह महानगर परिसरात 'एमएमआरडीए'मार्फत विकास कामे सुरू आहेत अशा बांधकाम ठिकाणांवर धूळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाण धुळमुक्त करण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत.
'क्लाऊड सिंडींग'चा प्रयोग करा : राज्यातील महानगरांमध्ये नागरी वन क्षेत्र (मियावाकी) वाढविण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा. वृक्षारोपण करावं. धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी 'स्प्रिंकलर्स'चा वापर करा. हवेतील प्रदुषणावर उपाययोजना करताना संनियंत्रण करावे. मुंबईमधील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी 'क्लाऊड सिंडींग'चा प्रयोग करावेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. राज्यातील प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा घेण्यात यावा. यावेळी 'आयआयटी'च्या तज्ञांनी प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
मुंबईतील हवा कशी? : 'सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR)-इंडिया'नं दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतील हवेची गुणवत्ता गुरुवारी सकाळी 9:30 वाजता 118 AQI होती. बुधवारी AQI हा 131 आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रदुषणाचं प्रमाण कमी झालं. बुधवारी रात्री मुंबईच्या काही भागात पावसानं हजेरी लावल्याने काहीसा दिलासा मिळाला. हवामान खात्याच्या (IMD) आकडेवारीनुसार गुरुवारी सकाळी 8.30 वाजता कुलाबा येथे 24.2 टक्के पावसाची नोंद झाली.
मुख्य सचिवांना अहवाल पाठवण्याचे निर्देश : सहा नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं केंद्र, राज्य शासनाच्या संबंधित मुख्य अधिकाऱ्यांना प्रदूषणाबाबत जबाबदार ठरवले. याचा परिणाम म्हणून राष्ट्रीय हरित लवाद खडबडून जागे झाले आहे. त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना १० नोव्हेंबरपर्यंत प्रदूषणाबाबत अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा-