मुंबई - लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एका व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. क्रेडिट कार्डच्या बिलासंदर्भात रिकवरी एजंट कडून धमकी येत असल्यामुळे सदरच्या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचविण्यात आले आहेत.
80 हजारांचे थकले होते क्रेडिट कार्ड बिल..
मुंबईतील मुलुंड परिसरात राहणाऱ्या कुणाल कौशिक (नाव बदलले आहे) या व्यक्तीने क्रेडिट कार्डचे 80,000 रुपयांचे बिल भरले नसल्यामुळे त्यास सतत रिकवरी एजंट कडून धमकीचे फोन येत होते. यास त्रासून या व्यक्तीने मुलुंड परिसरात असलेल्या तलावात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना, पोलिसांनी तास अडवून त्याचे प्राण वाचवले आहेत. लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेल्या कुणाल यास आर्थिक चणचण निर्माण झाल्यामुळे त्याने क्रेडिट कार्डचा वापर केला होता. मात्र सततचे फोन व त्यातून होणाऱ्या बदनामीला कंटाळून शेवटी त्याने आत्महत्येचा पर्याय निवडला होता.
पत्नीला पाठवला होता मेसेज..
ज्या वेळेस कुणाल कौशिक हा आत्महत्या करण्यास निघाला होता त्यावेळेस त्याने त्याच्या पत्नीला मोबाईल वर मेसेज करून आयुष्यातून जात आहे मला माफ कर असा मेसेज पाठवला होता. सदरच्या महिलेने तिच्या पतीने पाठवलेला मेसेज पाहून तो तात्काळ सोशल माध्यमांवर टाकून तिच्या पतीला वाचवण्याची विनंती केली होती. यासंदर्भात झोन-६च्या डीसीपीना त्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा कामाला लागून, काही मिनिटातच या व्यक्तीपर्यंत पोलीस पोहचले आणि त्याला आत्महत्या करण्यापासून अडवले. पोलिसांनी केलेल्या तपासात या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी रेल्वेखाली जीव देण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचेही समोर आले.