मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही नागरिक नियमांचं उल्लंघन करून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळए मुंबई पोलिसांनी अशा ४ हजार १३८ लोकांविरुद्ध कडक कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना संसर्गाचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासकीय स्तरावर केल्या जात आहेत. मुंबई पोलिसांकडून कलम 144 शहरात लागू करण्यात आली असून संचारबंदी कायम करण्यात आलेली आहे. शहरात जागोजागी नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून आवाहन करण्यात येत आहे. मात्र, काही बेशिस्त नागरिक संचारबंदीचा नियम मोडताना पाहायला मिळत आहेत. अशांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून 20 मार्च ते 9 एप्रिल या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी एकूण 4138 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, नियमांचे उल्लंघन करणार्या 231 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 732 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. यासोबतच 3174 आरोपींना पोलिसांनी जामिनावर सोडून दिले आहे.
गेल्या 24 तासात मुंबई शहरात कलम 188 नुसार पोलिसांनी तब्बल 275 जणांवर कारवाई केलेली आहे. यामध्ये विनापरवाना हॉटेल, आस्थापन सुरू ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. दक्षिण मुंबईत एकूण 28 जणांवर कारवाई करण्यात आलेली असून, मध्य मुंबई 48, पूर्व मुंबईत 76 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर, पश्चिम मुंबईत 69 व उत्तर मुंबईत 54 जणांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.