मुंबई : मुंबई पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा कॉल आल्याने मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मुंबईसह पुण्यात बॉम्बस्फोट करण्याची पुन्हा धमकी देण्यात आली आहे. मुंबईत अंधेरी आणि कुर्ला परिसरात उद्या म्हणजेच 24 जूनला सायंकाळी साडेसहा वाजता बॉम्बस्फोट घडवणार असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने कॉलद्वारे नियंत्रण कक्षाला दिली आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातही बॉम्बस्फोटाची धमकी - मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात आलेल्या अज्ञात कॉलरने यावेळी फक्त मुंबईच नाही तर पुण्यामध्ये देखील बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याची धमकी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षास काल सकाळी दहा वाजताच्या सुमारास हा धमकीचा फोन आला आहे. या फोननंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा फोन नेमका कुठून आला आणि कोणी केला याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल - मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल करणाऱ्याने गुरुवारी सकाळी 10 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला आणि दावा केला की 24 जूनला सायंकाळी 6:30 वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला या परिसरात बॉम्बस्फोट होणार आहेत. एवढेच नाही तर कॉलरने पुढे असा देखील दावा केला आहे की, आपल्याला दोन लाख रुपयांची गरज आहे आणि ही रक्कम मिळाल्यानंतर तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो. यावरून हा धमकीचा फोन फेक असावा अशी शक्यता मुंबई पोलिसांनी वर्तवलेली आहे.
दोन कोटी रुपये मिळाल्याचा दावा - धमकी देणाऱ्या या अज्ञात व्यक्तीने पुढे असे देखील सांगितले की, पुण्यात देखील बॉम्बस्फोट होणार आहेत आणि तो स्वत: हा स्फोट घडवून आणणार आहे. त्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. जर दोन लाख रुपये मिळाल्यास तो आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असा दावा कॉल करणाऱ्याने केला आहे. या कॉलनंतर एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई पोलीस सतर्क - या धमकीच्या फोननंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. तर तपासादरम्यान कॉलरने हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचे तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी यासंदर्भात भारतीय दंड संविधान कलम ५०५ (१)(बी), ५०५(२) आणि १८५ अन्वये गुन्हा दाखल केला असून अंबोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -