मुंबई - कोरोनाचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, नागरिकांना वारंवार सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरण्याचे आवाहन करूनही काही मुंबईकर नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 7 हजार 392 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
20 मार्च ते 19 ऑक्टोबर या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 22 हजार 836 प्रकरणात तब्बल 53 हजार 667 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करणार्या 8 हजार 280 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 21 हजार 293 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तर, 24 हजार 92 आरोपींना जामिनावर सोडण्यात आले आहे.
हेही वाचा - 'राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षाही राजकारणात व्यस्त'
दरम्यान, लॉकडाऊन काळात दक्षिण मुंबईत 2 हजार 404 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये मध्य मुंबईत 2 हजार 719, पूर्व मुंबई 3 हजार 644, पश्चिम मुंबई 3 हजार 706 तर उत्तर मुंबईत सर्वाधिक 10 हजार 363 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे कोरोना रुग्णासंदर्भात, हॉटेल आस्थापन विनापरवाना सुरू ठेवणे, पानटपरी किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, अवैध वाहतूक व इतर प्रकरणात नोंदवण्यात आलेली आहेत.
मुंबई शहर अनलॉकच्या दिशेने जात असताना नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करणे अत्यंत गरजेचे असून या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात येत्या दिवसातही मोठ्या प्रमाणात कारवाई करणार असल्याचे संकेत मुंबई पोलिसांनी दिले आहेत.