मुंबई : सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात अवमानकारक मजूक प्रकाशित केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली आहे. अवमानकारक मजकूर प्रकाशित करणाऱ्या दोन वेबसाईटविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाइट्सवर सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित करण्यात आला होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अवमान प्रकरणी इंडिक टेल्स या वेबसाईट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्यावतीने मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर आक्रमकपणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत संबंधित वेबसाईटवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारनंतर या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी या वेबसाइट्सविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवरून बुधवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले होते कारवाईचे आदेश- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयीच्या इंडिक टेल्स' ने लेखात अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्याने राजकीय संघटना, सामाजिक संस्थांकडून निषेध व्यक्त केला. त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली. मजकूर तपासून कारवाई करण्याचे त्यांनी पोलिसांना आदेश दिले. यापुढे महापुरुषांच्याबाबत अवमान होणार नाही व अत्यंत अभ्यासपूर्ण लिखाण करावे. त्याबाबत लेखकांसह प्रकाशकांनी दक्षता घ्यावी. अन्यथा असे आक्षेपार्ह लिहल्यावर कारवाई केली जाईल, अशा इशारा मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दिला आहे.
काय आहे आक्षेपार्ह- इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट वेबसाईटवर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी हीन पद्धतीचे लिखाण करून अवमान करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा काढून महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. मात्र, वेबसाईटमध्ये सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटिश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय अशा प्रकारची अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती. इंडेक्स टेल्स या वेबसाईटमधील लेख मुखरनिना या नावाखाली नीना मुखर्जी यांनी केला आहे. लिखाणच क्रेडिट हे @bhardwajspeeks भारद्वाज नावाच्या ट्विटर अकाउंटला देण्यात आले आहे. या अकाउंटवरून अनेक महापुरुषांच्या विरोधामध्ये संतापजनक लिखाण केले आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादीने मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते.
हेही वाचा-