मुंबई- मुंबई पोलीस दलामधील 1908 पोलीस कोरोना संक्रमित झाले आहेत. यामध्ये 267 पोलीस अधिकारी व 1641 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबईतील वेगवेगळ्या कोविड सेंटर मध्ये 543 पोलीस दाखल असून , 236 पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गृह विलगीकरणात 31 पोलीस कर्मचारी आहेत.
172 पोलीस सध्या उपचार घेऊन घरी गेले आहेत. कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन 647 पोलीस अद्याप कामावर रुजू झालेले नाहीत. तब्बल 258 पोलिसांनी कोरोनामुक्त होऊन पुन्हा कामावर येण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलीस खात्यातील 21 पोलिसांचा कोरोना संक्रमनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे एसआरपीएफ पोलीस खात्यात 82 जणांना कोरोनाची लागण झाली असून यात 5 पोलीस अधिकारी व 77 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोना विषाणूचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाच्या आर्थिक राजधानीत विविध उपाय योजना प्रशासकीय स्तरावर केल्या जात आहेत. राज्यात लॉकडाऊनचा 5 वा टप्पा सुरु झाला असून 30 जूनपर्यंत वाढवला गेला आहे. पोलिसांकडून शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 1274 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
20 मार्च ते 4 जून या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघण केल्याच्या 7268 प्रकरणात तब्बल 14881 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्या 1947 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.पोलिसांनी तब्बल 3883 आरोपींना नोटीस देऊन सोडले आहे , तर 9051 आरोपींना जामिनावर सोडून दिलेले आहे.
लॉकडाऊन काळामध्ये कलम 188 नुसार दक्षिण मुंबईत 915 गुन्हे दाखल करण्यात आले असून , मध्य मुंबईत 2005 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पूर्व मुंबईमध्ये 1222 गुन्हे दाखल झाले आहेत तर पश्चिम मुंबईत 1844 उत्तर मुंबईत 1282 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी , सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.