मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोना व्हायरस रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वतः जवाबदारी घेत घराबाहेर पडू नये, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नावाने एक ऑडिओ मेसेज सोशल माध्यमांवर फिरत आहे. या ऑडिओ मेसेजमध्ये मुंबई पोलीस आयुक्त नागरिकांना रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी न उतरण्याचे आवाहन करत असून रस्त्यावर विनाकारण वाहन घेऊन येणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देताना ऐकायला मिळत आहेत. सोशल माध्यमांवर सध्या ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे.