मुंंबई : अभिनेता सलमान खानला ईमेलद्वारे धमक्या मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. वांद्रे पोलिसांनी आयपीसीच्या कलम ५०६(२), १२०(बी) आणि ३४ अंतर्गत गुन्हादेखील नोंदवला आहे.
सलमान खानला धमकीचे मेल : याआधी शनिवारी मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानच्या कार्यालयाला धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या गुंडांवर तुरुंगात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
काय आहे तक्रारीत - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या व्यवस्थापक आणि मित्र प्रशांत गुंजाळकर यांनी शनिवारी रात्री वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत नमूद आहे की, धमकीचा संदर्भ हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून दिलेल्या मुलाखतीचा आहे. यामध्ये त्याने सलमानचे आयुष्य संपवायचे असल्याचे नमूद केले होते.
काय आहे धमकी - एफआयआरमध्ये म्हटले आहे की, शनिवारी दुपारी सलमान खानच्या ऑफिसच्या ईमेल पत्त्यावर धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. 'गोल्डी भाई को बात करनी है तेरे बॉस सलमान से' असे ईमेलमध्ये म्हटले होते. तसेच धमकीच्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, 'लॉरेन्स बिश्नोईकी देख ही लिया होगा उसने शायद, नही देखा हो तो बोल दिया देख लेने. मॅटर क्लोज करना है तो बात क्र्वा दीओ, फेस टू फेस कृणा हो वो बीटा डायो. अबी टाईम रहेते इन्फॉर्म करडिया है आगली बार झटका ही देखना को मिलेगा.'
लॉरेन्स बिश्नोईची सलमानला धमकी - पंजाबमधील गायक सिद्धू मूसवाला हत्याकांडातील आरोपी लॉरेन्स बिश्नोई याने एका खासगी वाहिनीला दोन दिवसांपूर्वी मुलाखत दिली होती. टीव्ही मुलाखतकाराने जेव्हा बिश्नोईला सलमानला धमकी दिली होती का? असे विचारले तेव्हा तो हो दिली असे म्हणाला. अद्यापही आमच्या बिश्नोई समाजाने त्याला माफ केलेले नसल्याचे लॉरेन्स त्यावेळी म्हणाला.
काय होते सलमानवर आरोप - राजस्थानमधील काळविट हत्या प्रकरणी सलमान खानवर आरोप आहेत. तसेच बिश्नोई समाज हा हरणाला पवित्र मानतो. त्यामुळे हा राग अजूनही बिश्नोई समाजाच्या मनात आहे. सलमानने बिश्नोई समाजाचे बिकानेरजवळ असलेल्या मंदिरात जाऊन माफी मागावी, अथवा आमच्याकडून ठोस कारवाई होऊ शकते, अशी धमकीच लॉरेन्स बिश्नोईने मुलाखतीत दिली होती.