मुंबई - मागच्या काही दिवसात झालेल्या पावसाने मुंबई विस्कळीत झाली होती. 'येरे येरे पावसा' म्हणणाऱ्या मुंबईकरांवर 'जारे जारे पावसा' म्हणायची वेळ आली होती. सध्या दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण असले तरी पुढील दोन-तीन दिवस पावसाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. पाऊस असेल पण जोरदार नसेल, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मागच्या आठवड्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने काल बुधवारी विश्रांती घेतली होती. अजून दोन तीन दिवस मुंबईत जोरदार पाऊस होणार नाही. पावसाच्या सरी कोसळतील मात्र जास्त वेळ नसेल. गुरुवारी मुंबईतल्या काही भागात सुर्याने डोके वर काढल्याचे दिसून आले. सध्या जूनमध्ये पडणाऱ्या पावसाची सरासरी या तीन चार दिवसात पूर्ण झाली आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचे अनुमान दिले आहे. यात दक्षिण कोकणात तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या दिवशी अतिवृष्टी होऊ शकते. तसेच मुंबईसह उत्तर कोकणातही पाऊसाच्या काही सरी कोसळतील, असे हवामान विभागाचे के एस होसाळीकर यांनी सांगितले आहे.