मुंबई - कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी देशपातळीवर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय आयुष मंत्रालयाने रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचा वापर करावा, अशी सूचना आरोग्य यंत्रणांना केली. त्यानंतर महानगरपालिकांनी आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यास सुरुवात केली. कोरोना रुग्णांचे केंद्रबिंदू ठरलेल्या मुंबईत या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यासाठी सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी एनजीओंकडून करण्यात येत आहे.
मुंबईत काही खासगी सेवाभावी संस्थांमार्फत होमीयोपॅथीक गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. मुंबईतील 'आरजू' या सामाजिक संस्थेकडून माटुंगा लेबर कॅम्प, सायन, धारावी सारख्या परिसरातील ३ ते ४ लाख कुटुंबांना आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे रेड झोनमध्ये असलेल्या या परिसरात आता रुग्णांची संख्या कमी झाल्याचा दावा या संस्थेने केला आहे. आणखी जास्त प्रमाणात आर्सेनिक अल्बम ३० या नागरिकांपर्यंत पोहचवयाच्या असल्यास सेवाभावी संस्थांना मुंबई महानगरपालिकेकडून आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी आरजूचे अध्यक्ष राजेंद्र मेहता यांनी केली.
मुंबईची लोकसंख्या पाहता अजूनही मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचा पुरवठा झालेला नाही. या गोळ्यांच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती वाढत आहे. नियमित वापर केल्यास अतिसार, कफ, घश्याला सूज किंवा वेदना, सर्दी, नैराश्य सारख्या आजारांवर उपचार केले जाऊ शकतात, असे होमीयोपॅथीक डॉक्टर राकेश मेहता यांचे म्हणणे आहे.
माटुंगा लेबर कॅम्प, सायन, धारावीसारख्या परिसरात आर्सेनिक या गोळ्यांच्या वाटपाने रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे का? असा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याला विचारला असता, त्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, केवळ आर्सेनिक अल्बम ३० मुळे नव्हे तर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या इतर उपाय योजानांमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. खासगी सेवाभावी संस्थांना आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून मुंबई महानगरपालिकेकडे काही संस्थांकडून पत्रे आली आहेत. लवकरच या संदर्भात निर्णय घेऊन योग्य ती आर्थिक मदत या खासगी सेवाभावी संस्थांना मुंबई महानगरपालिकेकडून केली जाईल, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.