मुंबई - मुंबईमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालिकेकडून कोल्डमिक्सचा वापर केला जातो. बुजवण्यात आलेले खड्डे पुन्हा दिसत असल्याने कोल्डमिक्सला नगरसेवकांकडून विरोध केला जात आहे. यामुळे कोल्डमिक्सबाबत आयआयटीच्या तज्ञांची मदत पालिकेकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी येत्या 18 नोव्हेंबरला बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती रस्ते विभागाचे मुख्य अभियंता संजय दराडे यांनी स्थायी समितीत दिली.
रस्ते खड्डेमुक्त मुंबईसाठी खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा, हे अभिनव उपक्रम जाहीर केले. स्थायी समितीच्या बैठकीत यावर नोंदवलेल्या आक्षेपांवर प्रशासनाने बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत निवेदन केले. निवेदनावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. सर्वपक्षीय सदस्यांनी मुद्द्याचे समर्थन करताना कोल्डमिक्सच्या दर्जावर संशय घेतला. पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी वापरलेले कोल्डमिक्स निकृष्ट होते. त्यामुळे खड्ड्यांवर ते तग धरु शकले नाहीत. पावसात वाहून गेल्याचा आरोप करत हॉटमिक्स वापरण्याची सूचना सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली. सर्वपक्षीय सदस्यांनी कोल्डमिक्स वादग्रस्त ठरत असल्याने ते महापालिकेतून हद्दपार करावे, अशी मागणी केली.
प्रशासनाकडून यावर खूलासा करताना, परदेशातील इस्राईल आणि ऑस्ट्रेलियात पावसाळ्यात कोल्डमिक्स वापरतात. हॉटमिक्स पावसांत टिकत नाही. त्यामुळे उन्हाळा आणि हिवाळ्यातच त्याचा वापर केला जातो. कोल्डमिक्सच्या संभ्रमांबाबत स्टॅक कमिटीच्या 55 बैठका झाल्या आहेत. परंतु, सातत्याने उपस्थित होणाऱ्या प्रश्नांबाबत येत्या 18 नोव्हेंबरला आयआयटीच्या तज्ञांची बैठक घेण्यात येणार आहे. आयआयटीचे प्राध्यापक, महापालिका अभियंते यात सहभागी होतील. नगरसेवकांच्या सूचनांचा विचार करुन या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मुख्य रस्ते अभियंते दराडे यांनी स्पष्ट केले.
सदस्यांनी यावर आक्षेप नोंदवत, कोल्डमिक्स दर्जाहीन आहे. परदेशातील आणि मुंबईतील दरात मोठी तफावत आहे. त्यांचा टिकावूपणा त्याचप्रमाणे असल्याने मुंबईकरांच्या माथी कोल्डमिक्स लादू नका, असे राऊत यांनी सांगत वादग्रस्त कोल्डमिक्सचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. तर कोल्डमिक्सचा हट्ट कशासाठी, कोणाचे हितसंबध यात गुंतले आहेत, याचा खुलासा करावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले. त्यामुळे वादग्रस्त कोल्डमिक्स प्रकरणी 18 नोव्हेंबरला काय निर्णय लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.